मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा

September 17, 2016 1:53 PM0 commentsViews:

औरंगाबाद, 17 सप्टेंबर : आज औरंगाबादमध्ये मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज सकाळी औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यान येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले. तसंच स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी पोलीस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदमही यावेळी उपस्थित होते.

marathwadaस्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलीस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला.

यावेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे आज या दिनाला विशेष महत्त्व आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच मराठवाडयात दुष्काळमुक्तीसाठी सरकारने अनेक काम केलीय. कायम स्वरूपी दुष्काळ संपवण्याचा सरकारचा संकल्प असून त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊ असं आश्वासन देखील फडणवीस यांनी दिलं. दरम्यान, यावेळी त्यांनी स्वातंत्र्यसेनानींना आणि नागरिकांना भेटून शुभेच्छा दिल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा