काश्मीरमध्ये लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, 17 जवान शहीद

September 18, 2016 12:32 PM0 commentsViews:

18 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर आज (रविवारी) पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे 17 जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात 4 दहशतवादी मारले गेले आहेत. यात 8 जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना श्रीनगरच्या लष्करी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. हल्ल्यानंतर लष्कराच्या विशेष कमांडोंनी मुख्यालयाचा ताबा घेतला असून कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. हल्ल्यांमागे लष्कर ए तोयबा आणि आयएसआयचा हात असल्याचा प्राथमिक अंदाज गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे.

नियंत्रण रेषेला लागून असलेल्या बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्कराचे हे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाला दहशतवाद्यांनी पहाटे लक्ष्य केले. गोळीबार करतानाच दहशतवाद्यांनी हँडग्रेनेडही फेकले. पहाटे 5.30 वाजल्यापासून चकमक सुरू आहे. त्यात लष्कराच्या 17 जवानांना जीव गमवावा लागला. तर, लष्करानं प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार दहशतवादी ठार झाले. पठाणकोट हल्ल्याइतकाच भीषण आणि मोठा हल्ला असल्याचं बोललं जातं आहे.

BRKING940_201609181215_940x355

तर काश्मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्याआधी त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि काश्मीरच्या सीएम मेहबूबा मुफ्ती यांच्याशी फोनवरून संपर्क केला. राजनाथ यांच्या बैठकीला, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, आयबी आणि रॉचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजितकुमार डोवाल, केंद्रीय गृह सचिव राजीव मेहरीशी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह उरीच्या दिशेनं रवाना झाले आहेत.

दरम्यान, 5 डिसेंबर 2014 रोजी दहशतवाद्यांनी असाच एक हल्ला काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उडी सेक्टर इथल्या लष्काराच्या महुरा तळावर केला होता. या हल्ल्यात एका लेफ्टनंट कर्नलसह 11 जवान शहीद झाले होते. त्याशिवाय दहशतवाद्यांनी शोपियॉ, सौरा, त्राल या भागातील हल्ल्यात 2 नागरिकांचा मृत्यू झाला होता. लष्काराने या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. हा हल्ला सुध्दा पहाटे 3.30 वाजता झाला होता आणि जवळपास 13 तास चकमक सुरु होती.

उरीमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा घटनाक्रम :

- लष्कराच्या 12 ब्रिगेडच्या मुख्यालयावर हल्ला
– पहाटे 5.30 वाजेपासून चकमक सुरू
– मुख्यालय परिसरात गोळीबार आणि स्फोटांचा आवाज
– लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक
– 3-4 दहशतवादी मुख्यालयात घुसल्याची शक्यात
– हल्ल्याच्या ठिकाणी पॅरामिलिट्री फोर्सचे विशेष पथक हेलीकॉप्टरने उतरवले
– 17 जवान शहीद, तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान
– पंतप्रधानांच्या आदेशानंतर संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख तात्काळ श्रीनगरकडे रवाना
– कोबिंग ऑपरेशन सुरू

उरीमध्ये झालेल्या दहशतवाही हल्ल्याची संभावित कारणं :

- 2 महिन्यांपासून काश्मीर खोर्‍यात तणाव
– तणावाच्या आधीपासून भारत-पाक संबंध ताणले गेलेत
– संयुक्त राष्ट्रात सध्या काश्मीरवरच चर्चा सुरू आहे
– अमेरिकेनं उघडपणे भारताची बाजू घेतली आहे
– भारतानं बलुचिस्तानचा मुद्दा उठवलाय
– बलुचिस्तानचा उल्लेख मोदींच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणातही

उरीलाच का टार्गेट केलं गेलं ?

- उरी हे ‘हाजीपीर पास’पासून जवळ आहे
– सर्व पास खुले असल्यानं उरीमध्ये प्रवेश करणं सोपं
– उरी हे लष्कराच्या हत्यारांसाठी महत्त्वाचा तळ
– कोणत्याही पोस्टवर जवान पाठवण्याआधी उरीलाच एकत्र
– त्यानंतर जवानांना त्यांच्या पोस्टिंगकडे पाठवलं जातं
– उरी सपाट पृष्ठभाग असल्यानं हल्ला करणं सोपं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा