उरी हल्ल्यामागे पाकचा हात – लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह

September 18, 2016 8:08 PM0 commentsViews:

ranbir

18 सप्टेंबर : ‘जम्मू काश्मीरमधील उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंग यांनी वर्तवली आहे. हल्ल्यात ‘परदेशी’ दहशतवादी सहभागी झाले असून त्यांच्याकडील शस्त्रास्त्रांवर पाकिस्तानचे चिन्हं असल्याचा मोठा खुलासाही त्यांनी केला आहे.

उरीमध्ये सैन्याच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले. तर चार दहशतवाद्यांना तीन तासांच्या चकमकीनंतर कंठस्नान घालण्यात आले. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याच्या लष्करी मोहीमेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना ते म्हणाले, आम्ही पाकिस्तानमधील समकक्ष अधिकार्‍यांशी चर्चा केली आहे. या घटनेतील दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी बनावटीचे शस्त्रास्त्र आढळले आहेत. आम्ही याची माहिती त्यांना दिली आहे. या हल्ल्यांमध्ये परदेशी दहशतवाद्यांचा हात आहे. प्राथमिक माहितीनुसार ‘जैश ए मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचा संशय आहे असं ते म्हणालेत.

दहशतवाद्यांकडून चार एके 47, एक बॅरेल ग्रॅनेड लाँचर आणि युद्धात लागणारी साधनसामग्रीही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं. भारतीय सैन्य सज्ज असून आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ असे त्यांनी आवर्जून सांगितलं. संरक्षणमंत्री जम्मू काश्मीरमध्ये आले असून त्यांना सैन्यप्रमुखांनी घटनेची सविस्तर माहिती दिली आहे असंही त्यांनी नमूद केलं.

दरम्यान, उरीमधली चकमक आता संपली असून चारही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. उरीतल्या लष्करी मुख्यालयातलं कोंबिंग ऑपरेशन आता पूर्ण झालं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा