उरी हल्ल्यात महाराष्ट्रातील 3 सुपुत्रांना वीरमरण

September 19, 2016 8:55 AM0 commentsViews:

shahid213

19 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील उरीमध्ये काल (रविवरी) लष्कराच्या मुख्यालयावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या 18 वर पोहोचली आहे. आज (सोमवारी) सकाळी उपचारादरम्यान आणखी तीन जवानांचा मृत्यू झाला आहे. तर शहिदांमध्ये महाराष्ट्राच्या तीन जवानांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं देशासह राज्यातही शोककळा पसरली आहे.

महाराष्ट्रातील शहीद जवानांमध्ये लान्सनायक चंद्रकांत शंकर गलांडे, शिपाई संदीप सोमनाथ ठोक आणि शिपाई विकास जानराव उईके यांना उरी हल्ल्यात वीरमरण आलं आहे. लान्स नायक गलांडे हे सातार्‍याच्या जाशी गावचे, संदीप ठोक हे नाशिकच्या खंडनगळीचे, तर उईके हे अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते. तीनही शहीद जवानांचे पार्थिव आज दुपारपर्यंत पुण्यात पाठवलं जाणार आहे. त्यानंतर त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येईल.

काल पहाटे पाचच्या सुमारास उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. बेछूट गोळीबार आणि हातबॉम्ब फेकून हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांनी फेकलेल्या बॉम्बचा स्फोट झाल्यानं जवानांसाठी उभारलेलं तंबू पेटलं. त्यामुळं 17 जणांना काल प्राण गमवावे लागले. तर 19हून अधिक जवान गंभीर जखमी झाले होते. त्यातील तीन जवानांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या संघटनेनं केल्याचं स्पष्ट झालं असून सर्व दहशतवादी पाकिस्तानी वंशाचे असल्याचं समोर आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा