नाशिकचे पोलीस निरीक्षक संजय विसपुतेंचा कार अपघातात मृत्यू

September 20, 2016 1:39 PM0 commentsViews:

 

vispute20 सप्टेंबर : नाशिकचे पोलीस निरीक्षक संजय विसपुते यांचा कार अपघातात जागीच मृत्यू झालाय. या अपघातात संजय विसपुते यांच्यासह शाबीरबी पिरमहम्मद शेख या महिलेचाही मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विसपुते पुण्याहून नाशिककडे आपल्या इनोव्हा (एमएच 15, सीटी 6543) कारने येत होते. डोळासने परिसरात समोरून आलेली बोलेरो (एमएच 16 एजे 6146) आणि इनोव्हाचा समोरासमोर धडक झाली. या अपघातात संजय विसपुते, शाबीरबी पिरमहम्मद शेख (50, रा़ घारगाव) या दोघांचा गंभीर मार लागल्याने मृत्यू झाला.

मूळचे नंदुरबार जिल्ह्णातील तळोदा येथील रहिवासी असलेले विसपुते हे पोलीस दलातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षा विभागात सुमारे दहा वर्षे कार्यरत होते़ त्यानंतर आॅक्टोबर 2015 मध्ये ते नाशिकला बदली होऊन आले होते. उपनगर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी त्यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली होती. काही दिवसांपासून रजेवर असलेले विसपुते हे सोमवारी दुपारी पुण्याहून नाशिकला येत असताना संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा