उरीत पुन्हा दहशतवादी हल्ला; 10 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद

September 20, 2016 7:33 PM0 commentsViews:

 uri news

20 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधली उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दोन दिवस उलटत नाही तोच आज (मंगळवारी) याच भागात पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पाकिस्तानच्या सीमेवरून दहशतवाद्यांना भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी अशा प्रकारे गोळीबार करण्याची पाकिस्तानची ही नेहमीचीच क्लृप्ती आहे. मात्र, भारतीय सैन्यानं या गोळीबाराला चोख उत्तर दिलं. भारतीय सैन्यानं केलेल्या गोळीबारात किमान दहा दहशतवादी ठार झाले, तर आणखी किमान 5 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना भारतीय लष्करातील एक जवान शहीद झाला आहे. लच्छीपोरा भागात दोन्ही बाजूंनी गोळ्यांच्या फैरी झडत आहेत.

आज दुपारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उरी सेक्टरमधील लछीपुरा परिसरात 15 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत होते. भारतीय जवानांनी कडा पहारा दिल्याने दहशतवाद्यांना भारतीय सीमेत घुसखोरी करण्यात अपयश आले. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात 10 दहशतवादी ठार झाले असून अद्याप 5 जण या परिसरात लपून बसले आहेत. भारतीय जवानांची कारवाई अद्याप सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वीच उरी इथल्या भारतीय लष्कराच्या मुख्यालयावर चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ज्यामध्ये 18 जवानांना आपले प्राण गमवावे लागले होते. या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराच्या जवानांना यश आले. दरम्यान, पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळीबार हा 2003 मध्ये झालेल्या दोन्ही देशांमधील शस्त्रसंधीच्या कराराचे उल्लंघन करणारा आहे. 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा