अल्पभूधारक शेतकर्‍याची भरारी, मधुमक्षिका पालनाद्वारे केली लाखांची कमाई

September 23, 2016 8:14 PM0 commentsViews:

23 सप्टेंबर – नितीन बनसोडे , लातूर

वेळोवेळी दुष्काळाचा सामना आणि निसर्गाचा लहरीपणा सहन करत शेती करणार्‍या असंख्य शेतकर्‍यांना आता शेतीसोबतच जोड व्यवसाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. कमी शेती असून देखील जोड व्यावसायाच्या साहाय्याने संकटांसोबत दोन हाथ करून बळीराजावर येणार्‍या संकटावर कशी मात करायची याचं उत्तम उदाहरण लातूर जिल्ह्यातल्या एका अल्पभूधारक शेतकर्‍यानं तमाम शेतकर्‍यांसमोर ठेवल आहे. लहरी निसर्गाच्या भरवश्यावर न राहता मधुमक्षिका पालनाद्वारे लाखोंचा व्यवसाय करून संकटाशी कसं झगडायचं याचा नमुना या शेतकर्‍यानं समोर ठेवला आहे.

honey bee

हे आहेत लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या मोहनाळ गावातील अल्पभूधारक शेतकरी दिनकर पाटील यांची मोहनाळ शिवारात फक्त चार एकर शेती आहे. अनेक वर्षांपासून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून होता मात्र, गेल्या दहा वर्षांपासून शेतीतुन कमी उत्पन्न मिळू लागल्याने त्यांनी कांहीतरी जोड व्यवसाय करण्याचा मानस केला आणि मधुमक्षिका पालनाचा व्यवसाय निवडला, पहिल्यांदा फक्त दहा पेट्या घेऊन थोड्याश्या पैश्यात हा व्यवसाय सुरु केला. थोड्याच दिवसात यातून भरगोस उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आणि दिनकररावांनी हा व्यवसाय वाढवायला सुरु केली. हळू हळू लातूर जिल्ह्यातच नाही तर इतर जिल्ह्यात देखील त्यांनी मधुमक्षिकांच्या पेट्यांचे हंगामानुसार स्थलांतर सुरु केलं आणि इतर जिह्ल्या सोबतच राजस्थान पंजाब आणि हरियाणा या राज्यात देखील हा व्यवसाय सुरु केला आणि भरघोस उत्पन्न मिळवलं. शेतीसोबतच हा व्यवसाय देखील शेतकरी किंवा त्यांच्या मुलांनी केल्यास यातून भरगोस उत्पन्न मिळू शकतं असा दिनकररावांचा दावा आहे.

वर्षाला चाळीस ते पन्नास किलो मधाचे उत्पन्न या व्यवसायातून दिनकर पाटील याना मिळत आहे. या व्यवसायासोबतच स्वतःचा कारखाना देखील दिनकररावांनी मोठ्या थाटात उभा केला आहे. या कारखान्यात संकलित केलेलं सगळं मध एकत्रित केलं जातं आणि व्यवस्थितरित्या सीलबंद बाटलीत हे मध विक्रीसाठी बाजारात पाठवलं जातं त्यामुळे बाटलीबंद मधाचा व्यवसाय देखील जोरात चालतो आहे. बाजारात देखील मधाला मोठी मागणी असल्यानं राज्याबाहेर देखील दिनकररावांचा मध विक्रीसाठी जातो आहे. या व्यवसायाला शिक्षणाची आणि वयाची कोणतीही अट नसल्यानं हा व्यवसाय शेतकर्‍यांसाठी आणि सर्वांसाठीच फायदेशीर ठरू शकतो असं मत दिनकर पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

राज्यात अनेक ठिकाणी अल्प भूधारक शेतकर्‍यांना दुष्काळ आणि निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका सहन करावा लागतो आहे. त्यामुळंे शेतकर्‍यांनी देखील अश्या प्रकारच्या जोड व्यवसायाची सांगड घालून शेती केल्यास शेतकर्‍यांना नवचेतना मिळेल आणि कर्जबाजारीपणाचं ओझं सहन करावं लागणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा