पाक कलाकार असलेले चित्रपट रिलीज होऊ देणार नाही -मनसे

September 25, 2016 8:08 PM0 commentsViews:

45mns_Vs_pak_Act43325 सप्टेंबर : भारतात पाकिस्तानी कलाकार असलेले चित्रपट रिलीज होऊ देणार नाही अशी नवी भूमिका मनसेनं घेतलीये. पाकिस्तानी कलाकारांच्या सिरीयल्सविरोधात केलेले आंदोलन यशस्वी झाल्याचा दावाही मनसेनं केलाय.

काश्मीरमध्ये उरी सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 18 जवान शहीद झाले होते. या घटनेमुळे देशभरात पाकविरोधात संतापाची लाट उसळलीये. मुंबईत महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या चित्रपट सेनेनं पाकिस्तानी कलाकारांना 48 तासांत देश सोडण्याचा इशारा दिला होता. जर देश सोडला नाहीतर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा सज्जड दम मनसेनं भरला होता.

मात्र, दुसरीकडे मुंबई पोलिसांनी पाकिस्तानी कलाकारांना संरक्षण देणार असल्याची भूमिका घेत मनसेच्या आंदोलनातून हवा काढून घेतली होती. एवढंच नाहीतर चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना नोटीसही बजावली होती.

या आंदोलनानंतर आता मनसेनं पुन्हा एकदा पाक कलाकारांविरोधात मोर्चा उघडला आहे. पाकिस्तानी कलाकार असलेल्या चित्रपटांना रिलीज होऊ देणार नाही अशी भूमिका आता मनसेनं घेतली आहे. मनसेनं पाकिस्तानी कलाकांरांच्या सिरियल्सला विरोध केल्यानंतर निर्मात्यांनी स्वतःहून कलाकारांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळच आली नसल्याचा दावा अमेय खोपकरांनी केलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा