मराठवाड्यात तुफान पावसाची नोंद, मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले

September 26, 2016 8:29 AM0 commentsViews:

Manjra Dam

26 सप्टेंबर : गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळाची झळ सोसणाऱ्या मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांचा पाणीप्रश्न अखेर मिटला आहे. मराठवाड्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावल्याने बीडमधील मांजरा धरण ओसंडून वाहू लागलं आहे. तब्बल 6 वर्षांनी धरण 90 टक्क्यांहून अधिक भरल्याने सहा दरवाजे पहाटे उघडले आहेत. याआधी 2010 मध्ये धरणाचे दरवाजे उघडले होते.

मांजरा धरणाच्या पाण्यावर 3 जिल्ह्यातील अनेक गाव अवलंबून आहेत. धरण भरल्याने या 3 जिल्ह्यातील गावांना फायदा होणार आहे. सध्या मांजरा धरणातून 250 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

दरम्यान, धरणाखालील मांजरा नदीकाठच्या सर्व गावांना याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात यंदा तुफान पावसाची नोंद झाली आहे. जालना, बीड, लातूर या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली आहे. या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 98.50 टक्के इतका पाऊस झाल आहे. बीड जिल्ह्यातील केज आणि अंबाजोगाई तालुका तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुका आणि लातूर शहरासाठी याच धनेगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. त्यामुळं आता हे धरण भरल्यानं लातूर शहरातील साडेपाच लाख लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा