मराठा मोर्च्यामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात की अस्वस्थता ?

September 26, 2016 7:35 PM0 commentsViews:

cm_martha_morcha33326 सप्टेंबर : मला हटवून मराठा समाजाचे प्रश्न सुटणार नाही किंवा मुख्यमंत्री म्हणून किती दिवस राहिल याची पर्वा नाही ही वक्तव्य आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. मुख्यमंत्र्यांच्या जर-तरच्या विधानामुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आहे की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळून आता जवळपास दोन वर्षे होतील पण मराठा मोर्चांनी त्यांच्या खुर्चीला वेढा टाकलाय की काय अशी स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळतेय तेही त्यांच्या वक्तव्यातून. सह्याद्री वाहिनीला फडणवीसांनी जी पहिली मुलाखत दिली. त्यातही त्यांनी मुख्यमंत्रिपदावरून त्यांना हटवण्याचे कसे प्रयत्न केले जातायत हे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुख्यमंत्री अमेरिका दौ•यावर गेले आणि काल पहिल्यांदाच ते माथाडी कामगारांच्या मेळाव्यात बोलत होते. तिथेही मुख्यमंत्र्यांनी मी जोपर्यंत मुख्यमंत्री आहे तोपर्यंत चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन असं म्हटलंय. एवढंच नाही तर एक दिवस जरी मुख्यमंत्रिपदाचा मिळाला तरी सार्थ करेन असं सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.

याचाच अर्थ असा की मुख्यमंत्रिपदाबाबत ते जर-तरची भाषा वापरतायत. त्यामुळेच मराठा मोर्चांमुळे मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात आलीय का अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगतेय. तसं नसेल तर प्रत्येक भाषणात ते मुख्यमंत्री असेन नसेन असं का म्हणतायत हा प्रश्न निर्माण झालाय.

विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अलीकडच्या काळात काही कडक निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. अधिवेशनाच्या काळात विरोधक आणि मुख्यमंत्र्यांमध्ये कोपर्डी प्रकरणावरुन चांगलीच खडाजंगी झाली होती. त्याचवेळी मराठा समाजाचा मुद्दा विरोधकांनी अधोरेखित केला होता. कोपर्डी प्रकरण आणि मराठा समाजाचा संबंध नाही असं मुख्यमंत्र्यांनी बजावूनही सांगितलं होतं.

तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा आणि मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची खाती कमी करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यांच्या या निर्णयामुळे पक्षात त्यांच्या विरोधात नाराजी सूर उमटले. तशी त्याची ग्वाहीही सह्याद्रीला दिलेल्या मुलाखतीत दिली होती. त्यामुळे मुख्यमंत्री मराठा मोर्च्यामुळे अस्वस्थ आहे की खरंच खुर्ची धोक्यात आहे हे मुख्यमंत्रीच स्पष्ट करू शकता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा