‘सामना’च्या कार्यालयावर दगडफेक, संभाजी ब्रिगेडनं स्विकारली जबाबदारी

September 27, 2016 5:01 PM0 commentsViews:

samana_Attack27 सप्टेंबर :मराठा क्रांती मोर्चांवर भाष्य करणाऱ्या शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तील व्यंगचित्राचे पडसाद आता उमटू लागले आहे. ठाणे, नवी मुंबईत सामनाच्या ऑफिसवर हल्ले करण्यात आले आहे. नवी मुंबईच्या ऑफिसवर दगडफेक तर ठाण्याच्या ऑफिसवर शाईफेक करण्यात आलीये. या हल्ल्याची जबाबदारी संभाजी ब्रिगेड संघटनेनं स्विकारली आहे.

राज्यभरात लाखोंच्या संख्येनं निघणाऱ्या मराठा मोर्च्यामुळे अवघा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. या मोर्च्यावर शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ने भाष्य करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते. या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. काल राज्यभरा़त ठिकठिकाणी सामना वृत्तपत्राची होळी करण्यात आलीये. झालेल्या प्रकाराबद्दल आजच्या सामनामधून दिलगिरीही व्यक्त करण्यात आली.

ठाण्यात ऑफिसवर शाईफेक

मात्र, आज दुपारी ठाण्यात सामनाच्या ऑफिसवर अज्ञातांनी शाईफेक केलीये. ठाण्यातल्या नितीन कंपनीजवळच्या श्रीजी आर्केड इमारतीतील पहिल्या मजल्यावरी सामनाचं ऑफिस आहे. या ऑफिसवर शाई फेकून अज्ञात लोकं फरार झाली. ठाणे पोलिसांनी सामना कार्यालयाला बंदोबस्त दिला असून या इमारतीच्या सीसीटीव्ही चा आधारे या अज्ञातांचा शोध नौपाडा पोलीस घेत आहेत.

नवी मुंबईत ऑफिसवर दगडफेक

तर नवी मुंबईतल्या सामनाच्या प्रिंटिंग प्रेसवरही दगडफेक करण्यात आलीये. एका वाहनातून आलेल्या लोकांनी प्रिटिंग प्रेसच्या दर्शनी भागावर दगडफेक केली. यात ऑफिसच्या काचा फुटल्यात. दगडफेक करणाऱ्यांनी तिथून निघून जाताना वॉचमनतच्या हातात संभाजी ब्रिगेडचं पत्रक दिलं असून हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं पत्रकात म्हटलंय. शिवाय व्यंगचित्र छापल्याबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांनी माफी मागावी अशी मागणीही ब्रिगेडनं केलीये.

औरंगाबादेत ऑफिसला शिवसैनिकांचं कडं

औरंगाबादेत सामना कार्यालयाला शिवसैनिक आणि पोलिसांनी कडे निर्माण केले आहे. संभाजी बिग्रेड औरंगाबाद कार्यालयावर हल्ला कऱणार अशी चर्चा होती. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे जिल्हाध्यक्ष अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांनी सामना कार्यालयाकडे धाव घेतली. खैरे यांनी कार्यालयाच्या पायऱ्यांवरच खुर्ची टाकून कार्यकर्त्यांसह बस्तान मांडलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा