कोणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता,’सामना’तून प्रभूदेसाई यांची दिलगिरी

September 28, 2016 10:10 AM0 commentsViews:

samana MAFI

28 सप्टेंबर : शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’तील वादग्रस्त कार्टूनप्रकरणी व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कोणत्याही समाजाचा भावना दुखवण्याचा माझा हेतू नव्हता. तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील ती मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी ‘सामना’तून व्यंगचित्र वादावर स्पष्टीकरण दिलं आहे.

मराठा मोर्चावरुन ‘सामना’मध्ये रविवारी वादग्रस्त कार्टून छापलं होतं. याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली. इतकंच नाही वादग्रस्त कार्टूनमुळे ठिकठिकाणी ‘सामना’ पेपर जाळून निषेध नोंदवला जात आहे.

‘सामना’त श्रीनिवास प्रभुदेसाई यांनी लिहिलं आहे की, “सामनाच्या ‘उत्सव’ पुरवणीतील माझ्या एका व्यंगचित्राने सध्या काहूर माजले आहे. विशेषत: मराठा समाजाच्या भावना व्यंगचित्रामुळे दुखावल्या व त्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता. तरीही कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो व त्या सदराचे नाव म्हणूनच ‘हसोबा प्रसन्न’ आहे. २५ सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो. या सर्व प्रकरणाचे राजकारण झाले व त्यात ‘शिवसेना’ व ‘सामना’स ओढण्याचा प्रयत्न काही लोकांनी केल्यामुळेच हा खुलासा करीत आहे.”

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी व्यंगचित्राचा वाद राजकीय फायद्यासाठी पेटवत आहे. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरेंनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा