‘ते’ व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नाही, शिवसेना बॅकफूटवर

September 28, 2016 4:47 PM0 commentsViews:

 मुंबई, 28 सप्टेंबर : ‘मुका मोर्चा’ व्यंगचित्रामुळे शिवसेना विरुद्ध मराठा समाज असा ‘सामना’ रंगलाय. अखेर हा वाद मिटवण्यासाठी ‘मातोश्री’वर बैठक पार पडली. ‘ते’ व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नाही आणि सामनाचीही नाही. ज्या व्यंगचित्राने हे व्यंगचित्र काढले तो एक सदरचा भाग होता. कोणत्याही समाजाच्या भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता असं म्हणत शिवसेनेनं हात झटकले आहे. तसंच बुलडाण्याच्या आमदार आणि खासदारांचीही मनधरणी करण्यात आली असून राजीनामास्त्र अखेर हे पेल्यातलंच वादळ ठरलंय.subhash_desai

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मराठा मोर्च्यावर ‘मुका मोर्चा’ अशा आशयाचे एक व्यंगचित्र रविवारच्या उत्सव पुरवणीत छापण्यात आले होते. साहजिकच या व्यंगचित्राचे पडसाद राज्यभर उमटले. ठाणे आणि वाशीमध्ये सामनाच्या कार्यालयावर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक केली. एवढंच नाहीतर बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमूलकर आणि डॉ. शशिकांत खेडेकर यांनी राजीनामास्त्र उपसले. यामुळे ‘मातोश्री’वर घडामोडींना वेग आला. रात्रीच बुलडाण्याच्या नाराज नेत्यांना मातोश्रीवर बोलावण्यात आले. खुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाराज आमदार आणि खासदारांशी चर्चा केली. सेनेचे नेते अनिल देसाई यांनी या नेत्यांची नाराजी दूर केली.

‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागलं’

‘मातोश्री’वर बैठकीनंतर सेनेचे नेते सुभाष देसाई यांनी मीडियाशी संवाद साधला. ‘ते’ व्यंगचित्र शिवसेनेची भूमिका नाही, सामनाचीही भूमिका नाही. ज्या व्यंगचित्राने हे व्यंगचित्र काढले तो एक सदरचा भाग होता. कोणत्याही समाजाला भावना दुखवण्याचा हेतू नव्हता असं स्पष्टीकरण देसाई यांनी दिलं. तसंच मराठा मोर्च्याला शिवसेनेचा पहिल्यापासून पाठिंबा आहे. मराठा मोर्च्यात मोठ्या डौलाने भगवा झेंडा फडकत आहे. हे पाहुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पोटात दुखू लागलं आहे. त्यामुळे ते त्यांना जमलं नाही ते शिवसेनेवर खापर फोडू पाहात आहे असा आरोपही देसाईंनी केला.

प्रभूदेसाईंचा माफीनामा

त्याआधी, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभूदेसाई यांनी जाहीर माफी मागितली आहे. कुणालाही दुखवायचा आमचा हेतू नव्हता. पण कुणी दुखावलं गेलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असं प्रभूदेसाईंनी म्हटलंय. व्यंगचित्राचा वाद अकारण आहे. मी एक कलावंत असलो तरी राजकीय व्यंगचित्रकार नाही. धकाधकीच्या जीवनात लोकांना दोन विरंगुळ्याचे क्षण मिळावेत म्हणून व्यंगचित्रे काढतो आणि त्या सदराचे नाव म्हणूनच हसोबा प्रसन्न आहे. 25 सप्टेंबरचे व्यंगचित्र मराठा समाजाला खटकले. मात्र कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू कधीच नव्हता हेही नम्रपणे सांगतो असं देसाईंनी स्पष्ट केलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा