ऊरी हल्ल्याचा बदला, पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा

September 29, 2016 2:43 PM0 commentsViews:

DGMO Ranbir Singh briefs media

29 सप्टेंबर :  उरी हल्ल्यानंतर आक्रमक पवित्रा घेत भारताने काल रात्री थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक कारवाई करत त्यांना जशास तसं उत्तर दिलं आहे. काही दहशतवादी भारतीय हद्दीत घुसखोरीच्या तयार असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करानं दहशतवाद्यांच्या तळांवर हवाई हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला, अशी माहिती महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

काश्मिर इथल्या उरीत लष्कराच्या मुख्यालयावर काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 18 जवान शहीद झाले होते. उरी हल्ल्यानंतर भारताची अत्यंत महत्त्वाची आणि धाडसी कारवाई मानली जात आहे.

‘दहशतवादी काल भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याची कुणकुण भारताला लागली. त्यानंतर भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खातमा केला,’ असं रणबीर सिंह म्हणाले. इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.

घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केलं. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे आता वाढवायचं नाही”, असं रणबीर सिंह म्हणाले.

दरम्यान, या हल्ल्यानंतर नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे. दुपारी 4 वाजता ही बैठक बोलावण्यात आलीये. या बैठकीसाठी शरद पवार हेही नवी दिल्लीला रवाना झाले आहेत. सर्जिकल हल्ले आणि एलओसीबाबत माहिती देण्यासाठी आणि सद्यपरिस्थीवर सर्वच राजकिय पक्षातील नेत्यांचं मत घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी भारतीय जावानांच अभिनंदन केलं आहे.

 कसा केला हा हल्ला

– पाकव्यप्त काश्मीरमध्ये काही दहशतवादी भारतात घुसण्यासाठी तयार होते
– 5 तळांमध्ये हे दहशतवादी होते, हे सर्व 5 तळ उडवले
– 7 दिवसांपासून गुप्तचर विभागाचं या तळांवर लक्ष होतं
– काल रात्री 12:30 वा. आपले सैनिक पाकव्याप्त काश्मिरात घुसले
– अनेक दहशतवादी आणि पाक सैनिकांचा मृत्यू
– पहाटे 4:30 पर्यंत ही कारवाई सुरू होती
– नियंत्रण रेषेपलिकडे 2 ते 3 किमी आता शिरून आपल्या सैनिकांनी ही कारवाई केली

सर्जिकल हल्ला म्हणजे नेमकं काय?

– काटेकोरपणे, शांत डोक्यानं टार्गेट ओळखून केलेला हल्ला
– गुप्तचर विभागाचा मोठा वाटा
– यासाठी विशिष्ट प्रशिक्षण दिलेले कमांडोज जातात
– टार्गेटला ठार मारण्याचे आदेश असतात. जखमी करून घेऊन येणं शक्य नसतं
– याचा निर्णय पंतप्रधानांच्या स्तरावर घेतला जातो
– सरकारमधल्या निवडक लोकांना याबद्दल माहित असतं
– शत्रूवर सर्जिकल हल्ला सुरू असताना लष्कराचं बारिक लक्ष असतं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा