भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीत तुफान राडा

September 30, 2016 8:46 AM0 commentsViews:

Bhagwan gadrada

पाथर्डी – 30 सप्टेंबर : भगवानगडावर दसरा मेळाव्यावरुन तुफान राडा झाला आहे. दसरा मेळावा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांना गडावरील तरुणांनी धक्काबुक्की करुन बेदम मारहाण केली आहे.

भगवानगडावर दसरा मेळावा होण्यासाठी भगवानगड दसरा मेळावा कृती समितीच्या वतीने पाथर्डीत बैठकीचं नियोजन करण्यात आलं होतं. मात्र बैठकीनंतर ठराव देण्यासाठी गेल्यानंतर गडावर तुफान राडा झाला. दसरा मेळावा कृती समितीच्या सदस्यांना गडावरील तरुणांनी धक्काबुक्की करुन बेदम मारहाण केली. यामध्ये काही पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली आहे.

भगवान गडावरील दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे यांचं भाषण होऊ नये अशी भूमिका गडावरील महंत नामदेव शास्त्री महाराजांनी घेतली आहे. तर परंपरेनुसार पंकजा यांचं भाषण होणारच अशी भूमिका दसरा मेळावा कृती समितीने घेतली आहे. यावरून या दोन्ही गटात वाद सुरू आहे.

पाथर्डीतल्या दसरा मेळावा कृती समितीच्या बैठकीनंतर सर्वजण महंत नामदेव शास्त्री महाराजांच्या भेटीला गेले. त्यापूर्वीच  गडावर परिसरातील नागरिक मोठ्याप्रमाणात जमा झाले होते. गडावरील गेट बंद करुन कृती समितीच्या नागरिकांना रोखून धरुन घोषणांचा जयघोष सुरु झाला. त्यावरुन दोन्ही गटात चांगलीच बाचाबाची झाली. चर्चेदरम्यान दोन्ही गटांचा तोल सुटल्याने बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं.

या जोरदार बाचाबाचीनंतरही कृति समितीला नामदेव शास्त्रींना निवेदन देता आलं नाही. त्यामुळे दसरा मेळावा पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडतो की, शास्त्री महाराज आपल्या निर्णयावर ठाम राहतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा