मुख्यमंत्री नळावरच्या बायकांसारखे भांडतात – सुप्रिया सुळे

September 30, 2016 2:59 PM0 commentsViews:

sUPRIYA SULE

मावळ – 30 सप्टेंबर :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्री सत्तेत आहेत हेच विसरतात. नळावर भांडणार्‍या बायकांप्रमाणे भांडत असतात. त्यांना मुख्यमंत्रिपद झेपत नाही, अशा शब्दांत सुळे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मुख्यमंत्र्यांची भाषणे पाहिली की भीतीच वाटते. मुख्यमंत्री जोरजोरात ओरडून भाषण करतात. ते सत्तेत आहेत आणि मुख्यमंत्री आहेत हेच विसरतात आणि विरोधी पक्षात असल्यासारखे बोलतात. सत्ता असते त्याने काम करून घ्यायचं असतं. हा मुख्यमंत्री काही ऐकूनच घेत नाही, त्याचा पारा चढलेलाच असतो. नळावर बायका भांडतात, तसा वसा वसाा भांडत असतो. आजपर्यंत इतके मुख्यमंत्री पाहिले, इतका चिडका मुख्यमंत्री पाहिला नाही. मुख्यमंत्री को इतना गुस्सा क्यों आता है? असं त्यांना विचारावेसं वाटतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

तसंच, मुख्यमंत्र्यांना भेटण्याची तशी भीतीच वाटते, मात्र जेव्हा वेळ येईल, तेव्हा हेल्मेट घालून भेटायला जावं लागेल. नाहीतर काहीतरी फेकून मारतील की काय, अशी भीती वाटते, या शब्दांत सुळे यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. मुख्यमंत्रिपद हे मोठे पद आहे. महाराष्ट्रातील जनता अपेक्षेने त्यांच्याकडे पाहते आहे, मात्र फडणविसांना मुख्यमंत्रिपद झेपत नसेल तर पद सोडावं, आम्ही मुख्यमंत्री पद संभाळ्ण्यास सक्षम आहोत असंही त्या म्हणाल्या.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा