जातीय आरक्षण देण्याला माझा ठाम विरोध – राज ठाकरे

October 2, 2016 9:54 PM0 commentsViews:
raj_thackery_mns10
ठाणे – 02 ऑक्टोबर : जातपात मानत राहिलो तर महाराष्ट्राचा युपी, बिहार व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा देत जातीय आरक्षण देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आहे. तसंच आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांनाच आरक्षण द्या, अशी मागणी केली आहे. ठाण्यात आयोजित मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
महाराष्ट्रात निघत असलेल्या मराठा मूक क्रांती मोर्चांच्या शिस्तीचं राज ठाकरेंनी कौतुक केलं आहे. तसंच, अॅट्रॉसिटीच्या गैरवापरावरही बोट ठेवले. तसंच जातीपातीच्या राजकारणात न पडण्याचं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

‘गेली १० ते १५ वर्ष केंद्रात आणि राज्यात आघाडी सरकारची सत्ता होती.  त्यावेळीच त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून मराठ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर होत आहे. आरक्षणाच्या माध्यमातून समाजात दरी निर्माण करण्याचं काम होतंय. सर्वच पक्षांना फक्त आरक्षणाचं राजकारण करायचं आहे’, असा आरोप राज यांनी केला. ‘निवडणुकांचा विचार करून मी कधीच भूमिका मांडत नसतो. तर महाराष्ट्राचा विचार करून भूमिका मांडतो. म्हणून नेत्यांनो, जाती जातीत विष कालवून महाराष्ट्राचं वाटोळ करू नका’, असं आवाहन राज यांनी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना केलं आहे.

त्याचबरोबर, आरक्षण मागताय पण सरकारी नोकऱ्या आहेत कुठे? मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपुरात उद्योग उभे राहत आहेत. त्यात ग्रामीण मुलांना रोजकार का मिळत नाही? असा सवाल करत राज यांनी विचारला आहे. तसंच महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये १०० टक्के मराठी तरूणांची भरती सक्तीची करा’, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी सर्व पक्ष एक आहेत हे कौतुकास्पद आहे. सलमान हा माझा मित्र असला तरी देश आणि राज्यासमोर दोस्ताचा विचार नाही, असे त्यांनी सांगितले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा