बारामुल्लातल्या हल्ल्यात 2 दहशतवाद्यांचा खात्मा, 1 जवान शहीद

October 3, 2016 8:37 AM0 commentsViews:

BRKING940_201610030855_940x355

03 ऑक्टोबर :   भारताने सर्जिकल स्ट्राइकद्वारे सीमेपलिकडील दहशतवाद्यांचे तळ उद्धस्त करत त्यांना धडा शिकवला असला, तरी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लात राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीवर काल (रविवारी) रात्री उशीरा दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला आहे. हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत लष्कर आणि बीएसफच्या जवानांनी चोख प्रत्युतर देत दोन दहशतवाद्यांचा खातमा केला. तर दहशतवाद्यांशी झालेल्या या धुमश्चक्रीत बीएसएफचा एक जवान शहीद झाला आहे.

बारामुल्ला इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी काल रात्री साडे दहाच्या सुमाराला सर्वप्रथम ग्रेनेड हल्ला केला. त्यानंतर लष्कराच्या 46 राष्ट्रीय रायफल्सच्या छावणीजवळ गोळीबार सुरू झाला. उशिरापर्यंत धुमश्चक्री सुरू होती. दहशतवाद्यांनी छावणीवर बॉम्बही फेकले. या हल्ल्याला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. या हल्ल्यात बीएसएफचा एक, तर सेनेचे तीन जवान जखमी झाल्याची माहिती आहे.

उरी हल्ल्यानंतर आपले जवान आणखी जास्त सतर्क होते. त्यामुळे जवळच असलेल्या पार्काच्या मार्गाने दहशतवाद्यांनी 46 आरआर तळात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरच त्यांचा खातमा झाला.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या हल्ल्याबाबत संपूर्ण माहिती घेतली असून बीएसएफते डीजीओ आणि सेनेचे कमांडिंग अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणीही केली. राष्ट्रीय रायफल्सच्या ज्या छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्या छावणीला खेटूनच बीएसएफचीही छावणी आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा