महाराष्ट्र देशा, मोर्चांच्या देशा !

October 3, 2016 10:22 PM0 commentsViews:

03 ऑक्टोबर : मराठा क्रांती मोर्चांनंतर राज्यात आता इतर जातींचेही मोर्चे निघू लागले आहे. ओबीसी, दलित आदिवासी या तिन्ही जात समुहांनी आपआपल्या मागण्यांसाठी मोर्चे काढायला सुरूवात केलीय. त्यामुळे महाराष्ट्र देशा ऐवजी आता मोर्चांचा देशा अशी म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊन ठेपलीय.

बघितलंच राज्यात सध्या जिकडे तिकडे फक्त मोर्चेच मोर्चे बघायला मिळताहेत. साता•ऱ्यात मराठा मोर्चा निघालाय तर नाशिकमध्ये ओबीसींचा मोर्चा निघालाय. तिकडे वाड्यातही आदिवासींनी प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढलाय. मराठ्यांचे मोर्चे हे आरक्षण आणि अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याच्या मागणीसाठी निघत आहेत.morcha_desha

नाशिकचा हा ओबीसी मोर्चा भुजबळांच्या समर्थनार्थ निघाला असला तरी मराठ्यांना ओबीसीत सामावून घेण्यास त्यांचाही ठाम विरोध आहे. किंबहुना मराठ्याचं हे विराट शक्तीप्रदर्शन बघूनच ओबीसींमध्ये अस्वस्थता वाढू लागली आणि त्यातूनच हा नाशिकचा मोर्चा निघाल्याचं बोललं जातंय. ओबीसींचे हे मोर्चे बघून उद्या दलित समाज रस्त्यावर उतरल्यास आश्चर्य वाटायला नको…तसंही अॅट्रॉसिटी कायदा रद्द केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दलित समाजाने यापूर्वीच देऊन ठेवलाय.

मराठा समाजाचे लाखांचे मोर्च बघून सरकार त्यांच्या मागण्यांसाठी काहीसं अनुकूल दिसत असलं तरी ओबीसी, आदिवासी आणि दलितांमधली वाढती अस्वस्थता सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकते. बरं हे कमी की काय म्हणून तिकडे भगवानगडावर वंजारी समाजाने विराट मेळावा घेण्याची तयारी चालवली आहे. विशेष म्हणजे सरकारच्या दिग्गज मंत्री पंकजा मुंडेच याकामी पुढाकार घेताना दिसत आहेत. मध्यतंरी त्या भुजबळांनाही भेटून आल्यात. या ओबीसी नेत्यांच्या भेटीनंतरच नाशिकमध्ये ओबीसींचा हा विराट मोर्चा निघालाय. एकूणच कायतर राज्यात निघणा•ऱ्या जातीय मोर्चांमुळे भाजप सेनेचं सरकार चोहीबाजुनी पुरतं घेरलं गेलंय असंच म्हणावं लागेल.. पाहुयात हे मोर्चांचं चक्रव्युव्ह देवेंद्र फडणवीस लिलया भेदतात की या जातीय मोर्चांंमध्ये त्यांचाच अभिमन्यू होतोय.
‘मराठा क्रांती मोर्चा’ चा घटनाक्रम
1. नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी बलात्कार घटनेचा निषेध करण्यासाठी औरंगाबादमध्ये पहिला मराठा मूक मोर्चा
2. कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना फाशी, मराठा समाजाला आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी
3. अरबी समुद्रातलं शिवाजी महाराज स्मारक, मराठा विद्यार्थ्यांसाठी EBC सवलतीच्या मर्यादा वाढवणे, शेतीमालाला हमीभाव या मागण्यांचाही समावेश
4. लाखोंची गर्दी, महिला आणि युवतींचा सहभाग, शिस्त, शांतता ही मोर्चाची वैशिष्ट्यं
5. मराठा मोर्चांना सर्वपक्षीय पाठिंबा पण राजकीय प्रतिनिधींना शेवटंच स्थान
6 ऍट्रॉसिटी कायद्यातल्या जाचक तरतुदी काढून त्यात बदल करण्याचं शरद पवारांचं वक्तव्य
7. सातार्‍याच्या मोर्चामध्ये ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची उदयनराजे भोसलेंची मागणी
8 . मराठा मोर्चांना प्रत्युत्तर म्हणून दलितांनी प्रतिमोर्चे काढू नये – डॉ. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन
9. राज्यभरात मराठा – दलित ऐक्य परिषद भरवण्याची रामदास आठवलेंची घोषणा
10. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मला पदावरून हटवण्याचे मनसुबे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
11. मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि ऍट्रॉसिटी कायद्यात बदल यासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची शिवसेनेची मागणी
12 . मराठा मोर्चांबद्दल ‘सामना’ मध्ये आलेल्या व्यंगचित्रावरून वाद आणि नंतर उद्धव ठाकरेंचा माफी
13. आरक्षण जातीवर नको तर आथिर्क निकषांवर द्या – राज ठाकरेंची मागणी
14. मराठा मोर्चांनंतर ओबीसींचा छगन भुजबळांच्या समर्थनासाठी मोर्चा
15. आता दिवाळीनंतर मुंबई आणि दिल्लीतही निघणार मराठा मोर्चा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा