आदिवासी एकजुटीचा विजय, सावरांच्या घराचा घेराव 14 तासांनंतर उठला

October 4, 2016 1:54 PM0 commentsViews:

adivasi_wada04 ऑक्टोबर : पालघरमधलं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या घरासमोर सुरू असलेलं आदिवासींचं आंदोलन तब्बल चौदा तासांनी मागे घेण्यात आलं. 7 दिवसांत मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं.

आदिवासी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी डाव्या संघटनांनी या आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार सोमवारी दुपारी एक वाजेपासून आदिवासींनी मंत्र्यांच्या घराला घेराव घातला आणि आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोवर हटायला नकार दिला. अखेर रात्री उशीरा आदिवासी विकास विभागाचे सचिव राजीव जाधव यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

या बैठकीला किसान सभेचे केंद्रीय सहसचिव अशोक ढवळे हे उपस्थित होते. येत्या 7 दिवसांत आदिवासी विभागाचे अधिका•यांसोबत बैठक घेऊन यावर तोडगा काढायचं आश्वासन जाधव यांनी दिलं. त्यानंतर खांडेश्वरी नाक्यावर सभा घेऊन हे आंदोलन संपल्याची घोषणा करण्यात आली. धो धो पाऊस असूनही आदिवासींनी आपलं आंदोलन चालूच ठेवलं. एकंदरीत सरकारची नरमाईची भूमिका पहाता आदिवासींचं हे घेराव आंदोलन यशस्वी झालं असंच म्हणावं लागेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा