आता चर्चा प्रफुल पटेलांची

April 22, 2010 8:54 AM0 commentsViews: 13

22 एप्रिल

आयपीएलमधला वाद रोज नवनवीन वळणे घेत आहे. आता अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आयपीएलच्या वादासंबंधात पंतप्रधानांना माहीती दिली आहे.

पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जी यांनी शशी थरूर, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्या आयपीएलमधील सहभागाबद्दलही चर्चा केली आहे.

त्यामुळे प्रफुल पटेल आता आयपीएलमधील वादाच्या भोवर्‍यात अडकण्याची चिन्हे आहेत.

प्रफुल पटेल यांच्या सेक्रेटरीने शशी थरूर यांना लिलावाच्या 2 दिवस आधी ई-मेल पाठवल्याचे उघड झाले आहे.

पटेलांची मुलगी पूर्णा आयपीएलसोबत काम करत आहे.

24 वर्षीय पूर्णा आयपीएलचा मार्केटिंग आणि हॉस्पिटालिटी विभाग सांभाळते. आयपीएलमधील दोन नवीन टीमच्या लिलावांच्या प्रक्रियेत पूर्णाचा सहभाग होता. त्यामुळे थरूर यांचा मेल तिनेच आपल्या वडिलांना पाठवला असल्याचे बोलले जात आहे.

प्रफुल्ल पटेल यांच्या ऑफिसमधून शशी थरूर यांना पाठवण्यात आलेल्या या मेलमध्ये पुढील मुद्दे आहेत…

कोची टीमच्या 2010 पर्यंतच्या आर्थिक उलाढालीचे अंदाजपत्रक आहे

2021 पर्यंत टीम नफ्यात येणार नसल्याचे अंदाजपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे

शिष्टाचार आणि गेट फीच्या महसुलाचा तपशीलही त्यात आहे

लायसन्स आणि स्पॉन्सरशिपमधून मिळणार्‍या उत्पन्नाचा तपशीलसुद्धा आहे

खेळाडू, फ्रँचाईजच्या फीची आकडेवारीसुद्धा त्यात देण्यात आली आहे

हा मेल लिलावाच्या दोन दिवसांपूर्वी पाठवण्यात आला होता.

राष्ट्रवादीचा खुलासा

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा आयपीएल वादाशी काहीही संबंध नाही. कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते डी. पी. त्रिपाठी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची या वादाबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पटेल यांची मुलगी पूर्णा हिची पाठराखण केली. पूर्णाने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, असे ते म्हणाले.

तसेच शरद पवारांचे जावई सदानंद सुळे यांचे आयपीएलच्या कुठल्याही कंपनीत शेअर्स नाहीत, असा दावा त्यांनी केला. त्याचवेळी यावरून भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ असणार्‍या शरद पवारांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही, असेही ते म्हणाले.

close