स्पेशल रिपोर्ट : का पेटला भगवानगड दसरा मेळाव्याचा वाद ?

October 6, 2016 11:03 PM0 commentsViews:

06 ऑक्टोबर : पंकजा मुंडे आणि महंत नामदेवशास्त्री सानप यांच्यातल्या वादामुळे भगवानगड पुन्हा एकदा वादाचं केंद्रस्थान बनलाय. गडावरड्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंना भाषण करू देण्यास नामदेव शास्त्रींनी विरोध केलाय. तर आपण गडावर जाणारच असा आक्रमक पवित्रा पंकजा मुंडेंनी घेतलाय त्यामुळे येत्या दसरा मेळाव्याला भगवानगडावर वर्चस्ववादाचा मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हं दिसत आहेत.

भगवान गड….भगवान बाबांना वंजारी समाजात संतमहात्यांचा दर्जा असल्याने साहजिकच हा गड देखील वंजारी समाजाचं अढळ श्रद्धास्थान बनलंय.. पण आज हेच धार्मिक श्रद्धास्थान आज मितीला समाजाच्या सो कॉर्ड नेत्यांमधल्या राजकीय वर्चस्ववादाचं केंद्रस्थान बनून गेलंय. भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होऊ देण्यास तीव्र विरोध दर्शवलाय. तर पंकजा मुंडेंनी पारंपारिक दसरा मेळाव्यासाठी गडावर चलाची हाक दिलीय. त्यामुळे मुंडे समर्थकांनी गडावर पंकजांचे भाषण झालंच पाहिजे असा आग्रह धरलाय. त्यासाठी गड परिसरातल्या ग्रामपंचायतींचे ठरावही पास करून घेतलेत.bhagvan_gad

दरम्यान, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी मात्र, कसल्याही परिस्थितीत ग़डावर पंकजांचं भाषण होऊ देणार नसल्याचं म्हटलंय. भगवानगड हे फक्त वंजारी समाजाचं नाहीतर सर्व जातीधर्माचं श्रद्धास्थान आहे.

भगवानगडाचे हे महंत आता गडाचा राजकीय गैरवापर होऊ देण्यास कितीही विरोध करत असले तरी त्यांची नियुक्तीही गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय आशिवार्दानेच झाल्याचं सर्वश्रूत आहे. पण गोपीनाथ मुंडेंचं निधन झाल्यापासून पंकजा मुंडे आणि महंत यांच्यातले संबंध दुरावले आणि त्यातूनच हा वाद चिघळल्याचं बोललं जातंय. गडावरच्या या वर्चस्ववादाला पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या बहिणभावातला राजकीय संघर्षही कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. धनंजय मुंडेंच्या राजकीय आर्शिवार्दामुळेच महंतांनी पंकजांशी उभा पंगा घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण सध्यातरी हे ते उघडपणे मानायला तयार नाहीत.भगवानगड हे समाजाचं श्रद्धास्थान असल्याने त्याचा राजकीय गैरवापर होऊ नये एवढंच ते सांगतात.

भगवान गडाचा राजकारणासाठी गैरवापर होत नसल्याचं धनंजय मुं़डे कितीही नाकारत असले तरी दुदैर्वाने भगवान गडाचा वापर आजवर फक्त राजकारणासाठी होत आलाय.अगदी त्यांचे काका म्हणजेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनाही याच भगवानगडावरून दिल्ली दिसली होती. त्यांच्या कन्या पंकजा आणि प्रीतम या देखील भगवान गडावरून निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या लाटेवरच लाखांच्या मतांनी निवडून आल्यात. मुं़डेंच्या आधीही बबनराव ढाकणेही याच भगवान गडाच्या पाठिंब्यामुळे बीडमधून खासदार बनले आणि थेट केंद्रात मंत्री देखील बनले होते. भगवान गडाचा हाच राजकीय महिमा धान्यात घेऊन पवारांनी धनंजय मुंडेला थेट विरोधी पक्षनेता बनवल्याचं बोललं जातंय. कारण भाजपच्या माधवम फार्म्युल्याचा मागर्ही या अशा भगवान गडांसारख्याच विविध समाजांच्या धार्मिक स्थळांमार्गे जातो.

याच भगवान गडाच्या जोरावर ढाकणे, मुंडेंसारखे नेते मोठे झाले…पण समाज मात्र, आजही आहे तिथेच आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या साधारणतः दीड ते दोन टक्के असलेला हा वंजारी समाज प्रामुख्याने बीड, नगर आणि काहीप्रमाणात नाशिक जिल्ह्यातही आढळून येतो. त्यापैकी बीड जिल्ह्यातला बहुतांश वंजारी समाज हा आजही ऊसतोड करूनच पोटाची खळगी भरतो.त्यांच्या मुंलाना साखर शाळांमधूनच अर्धवट शिक्षण घ्यावं लागतंय. पण केवळ राजकीय स्वार्थासाठी भगवान गडासारख्या धार्मिक स्थळांचा वापर करणाऱ्या नेत्यांना त्याचं काहीच सोयरसुतक नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा