भारत- पाक सीमेवर लेसर भिंत

October 7, 2016 4:39 PM0 commentsViews:

leser_Wall07 आॅक्टोबर : अतिरेक्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर लेसर भिंत बांधण्यात येणार आहे. सीमारेषेवर नदीकाठच्या भागात हा हायटेक उपाय करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलंय.

पठाणकोटच्या हल्ल्यानंतर पंजाब प्रांतातल्या सीमेचं पुन्हा सर्वेक्षण करण्यात आलं. जिथेजिथे अतिरेकी घुसण्याचा धोका आहे त्या भागात आता हे लेसर तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. कुणीही सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला तर मोठ्याने सायरन वाजेल आणि सीमा सुरक्षा दलाला घुसखोरांबद्दलचा इशारा मिळू शकेल.

आतापर्यंत सीमेवरच्या 6 संवेदनशील ठिकाणी अशा प्रकारची लेसर भिंत बांधण्यात आलीय. याआधी नदीकाठच्या भागात कॅमेरे लावण्यात आले होते. पण या कॅमेर्‍यांमध्ये नीट चित्रिकरण होत नाही, असं आढळून आल्यानंतर लेसर भिंत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.

पठाणकोटच्या हल्ल्याआधी सीमेवरच्या बमियाल भागात उज्ज नदीच्या कोरड्या पात्रातून जैश ए मोहम्मदचे सहा अतिरेकी गेले, असा संशय आहे. या भागात लेसर भिंत असती तर हे अतिरेकी घुसल्याचा इशारा तेव्हाच मिळाला असता. आता या भागात हायमास्ट लाईट्सही लावण्यात आलेत. त्याचबरोबर सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची कुमकही वाढवण्यात आलीय. घुसखोरी रोखण्यासाठी नदीपात्रामध्ये बोटीने गस्त ठेवावी लागणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा