मुख्यमंत्र्यांची क्लीन चिट देण्याची योजना – विखे पाटील

October 8, 2016 6:51 PM0 commentsViews:

Vikhepatil

08 ऑक्टोबर :  पंकजा मुंडे यांच्या आवाजातल्या ऑडिओ क्लिपची सत्यता तपासावी आणि त्यात सत्यता आढळली तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलीय. पण मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देण्याची एक खिडकी योजनाच सुरू केलीय, असंही ते म्हणाले.

भगवानगडावरचा दसरा मेळावा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलाय. त्यामुळे आता या दोन दिवसांत काय घडणार, याकडे अनेकांचं लक्ष
लागलंय. भगवानगडावरून राजकीय भाषणं होऊ नयेत, असा निर्णय ट्रस्टने घेतल्याने नामदेवशास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यातच पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. नामदेवशास्त्रींकडे दसरा मेळाव्यानंतर बघून घेईन, अशी धमकी पंकजा मुंडेंनी या ऑडिओ क्लीपमध्ये दिली होती.

मंत्रीच गुंडगिरीची भाषा करत असतील तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. आता विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पंकजा मुंडेंवर कारवाईची मागणी केलीय.

पंकजा मुंडे भगवानगडावर जाणारच
पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्याच्या दिवशी भगवानगडावर जायचा निर्धार केलाय. त्या दसर्‍याच्या दिवशी सकाळी 11 वाजता गोपीनाथगडावर स्मारकाचं दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पांगरी इथून त्या थेट हेलिकॉप्टरने भगवानगडावर जाणार आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा