नाशिकमध्ये परिस्थिती नियंत्रणात, जनजीवन हळूहळू पर्वपदावर

October 10, 2016 10:17 AM0 commentsViews:

नाशिक, 10 ऑक्टोबर :   त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगाव (अंजनेरी) इथे पाच वर्षांच्या चिमुरडीवरल अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जिल्ह्यात उमटले. जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन करत संशयित आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, रास्ता रोकोमुळे जिल्हाभरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन हळूहळू पर्वपदावर येत आहे. मध्यरात्रीनंतर आंदोलन थांबवण्यात आलं आहे. सध्या मुंबई-नाशिक वाहतूक खुली करण्यात आली आहे.

अफवा पसरवणार्‍यांवर कारवाई होणार- पोलीस आयुक्त
पोलिसांनी संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. तसचं या घटनेबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या गेल्या. अशा समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. अशी माहिती पोलीस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी दिली.

Nashik ca

दोषींवर कठोर कारवाई करू – मुख्यमंत्री
नाशिकमधल्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली असून, या मुलीची प्रकृती सुधारतेय. या प्रकरणानंतर समाजात निरनिराळ्या माध्यमांतून वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र त्या चुकीच्या असून त्यावर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता पाळून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखावी, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी नागपुरात केलं आहे. तसंच जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिश महाजन यांनी स्वतः जाऊन पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. या प्रकरणी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

IBN लोकमतचं आवाहन
नाशिकमध्ये एका चिमुरडीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला आणि त्याची संतप्त प्रतिक्रिया उमटली. एक जबाबदार माध्यम म्हणून त्यातलं जेवढं रिपोर्ट करण्यासारखं आहे ते आम्ही करतोय. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि नाशिकला तर दक्षिणेतली गंगा उगम पावते. त्र्यंबकेश्वर तर मराठी माणसाचं श्रध्दास्थान. त्यामुळे एखाद्या घटनेवर संताप अनावर होणं स्वाभाविक आहे. पण तो संताप आपण कायदेशीर मार्गाने व्यक्त केला पाहिजे. गुन्हेगार पकडला जावा, त्याला कठोर शिक्षेसाठी प्रयत्न व्हावेत. पण कुठल्याच स्थितीत जाळपोळ, तोडफोड, समाजात तणाव निर्माण होईल असं कृत्य करू नये असं आम्ही आपल्याला आवाहन करतोय. पोलीसांचा बंदोबस्त कडक आहे. त्यांना सगळ्यांनी मदत करावी. कुणी अफवा पसरवत असेल तर त्याला बळी पडू नका. नाशिकला शांत करण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपला इतिहास शांततेचा आहे. शिवाजी महाराज, शाहु, फुले, आंबेडकरांचा आपण वारसा जपतोय आणि त्यांची शिकवण लक्षात ठेवण्याची गरज आहे. मराठी समाज म्हणून आपली विविधतेची एक घट्ट वीण आहे. ती पिढ्यानपिढ्यांच्या आपुलकीतून, सहजीवनातून तयार झालेली आहे. ती कुठल्याच स्थितीत विसकटणार नाही याची काळजी आपण प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा