पवारच घोटाळ्याला जबाबदार

April 23, 2010 9:21 AM0 commentsViews: 2

23 एप्रिल

आयपीएलच्या घोटाळ्यातून शरद पवार कसे काय हात झटकू शकतात? तेच या सगळ्या प्रकाराला जबाबदार आहेत, असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पवारांवर तोफ डागली.

आयपीएलच्या वादावर इतके दिवस शांत बसलेल्या राज यांनी आता या वादात उडी घेतली आहे.

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मनसेचा अजेंडा सांगण्यासाठी राज यांनी आज पत्रकार परिषद घेतली.

मोदींवर केसेस होत्या. मग नेमकी अशीच माणसे पवारांभोवती कशी फिरतात? असा सवालही राज यांनी केला. तसेच आयपीएलवर बंदी नव्हे, तर त्याची चांगली साफसफाई केंद्राने करावी असेही राज यांनी म्हटले.

आतापर्यंत पवारांवर थेट टीका करण्याचे टाळणार्‍या राज यांच्या या पवित्र्यांनंतर राजकीय वातावरण अजूनच तापण्याची चिन्हे आहेत.

पटेलांच्या राजीनाम्याची मागणी

शिवसेनेने राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेल यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आयपीएलमधील घोटाळ्यांप्रकरणी नागरी हवाई वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल संशयाच्या भोवर्‍यात आहेत. त्यांच्या मुलीचे नावही या प्रकरणी पुढे येत आहे.

त्यामुळे पटेल आणि राष्ट्रवादी कितीही खुलासा करत असले, तरी पटेलांनी राजीनामा द्यावा, असे सेनेने म्हटले आहे.

लोकसभेत सरकार धारेवर

आज लोकसभेत आयपीएल घोटाळा आणि प्रफुल पटेलांचा सहभाग या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. सुरूवातीला लोकसभेच्या विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी हा मुद्दा लावून धरला.

सरकार आघाडी टिकवण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाठीशी घालत आहे, असा आरोप स्वराज यांनी केला.

तोच मुद्दा लावून धरत शरद यादव यांनी या प्रकरणी संयुक्त संसदीय चोकशी समितीची मागणी केली. हे अतिशय गंभीर प्रकरण आहे.

आधीच दोन केंद्रीय मंत्र्यांची नावे यात आली आहेत. तेंव्हा संयुक्त संसदीय चौकशी समिती स्थापन करून ही चोकशी करा, अशी मागणी शरद यादव यांनी केली आहे.

'चौकशीला हरकत नाही'

लोकसभेत आज आयपीएलप्रकरणी संसदीय समितीची स्थापना केली जावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यावर पवारांनी काही वेळापूर्वीच उत्तर दिले.

आम्ही कुठलीही चूक केली नाही. संसदीय समितीच्या चौकशीला हरकत नाही, असे पवारांनी म्हटले आहे.

close