अभिमन्यू करण्याचा प्रयत्न केला जातोय, पंकजा मुंडेंचा थेट आरोप

October 11, 2016 5:07 PM0 commentsViews:

pankaja_bhgwangad10 ऑक्टोबर : आज गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मी पुढे नेत आहे. पण कुणावर किती आरोप करायचे ? किती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे ? किती अभिमन्यू सारखं घेरायचं. कुठे गुन्हे दाखल करायचे ?, किती वेळा राजीनाम्याची मागणी करायची. आता तुमच्या म्हशीला दूध आले नाहीतर मी राजीनामा द्यायचा का ? असा टोला महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला. तसंच भगवानगड वादावर बोलताना पुढच्या मेळाव्याला महंत मला मुलगी म्हणून बोलावतील असा विश्वासही पंकजा मुंडेंनी व्यक्त केला.

अखेर पंकजा मुंडे यांची सभा भगवानगडाच्या पायथ्याशी पार पडली. मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक या सभेला एकवटले होते. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, कॅबिनेट मंत्री राम शिंदे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या भाषणानंतर पंकजा मुंडे यांनी विरोधकांना समाचार घेत चौफेर हलाबोल केला. भाषणाच्या सुरुवातीलाच मी आधी भगवान बाबांची भक्त आणि मुंडे साहेबांची कन्या आहे. भगवानगडाच्या बाबती माझ्या तोंडी मरेपर्यंत वाईट काही निघणार नाही. माझ्या भुमिकेत प्रतहारणा असेल तर एवढी जनता आज माझ्यासाठी इथं एकवटली नसती असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

‘आम्ही काय अतिरेकी आहोत का?’

आधी भगवानगडावर सभा घेण्यास परवानगी नाकारली. आता पायथ्याशी सभा घेण्यासाठी परवानगी मिळालीही पण आमच्या गाड्यांना अडवलं जातं, आम्हाला पुढे येण्यास मज्जाव घातला जातो. आम्ही काय अतिरेकी आहोत का जे आम्हाला अशी वागणूक दिली जाते असा सवाल पंकजांनी उपस्थिती केला.

‘माझ्यामुळे माझ्या भावांना लाल दिवा’

महादेव जानकर, राम शिंदे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडेंवर स्तुतीसुमनं उधळली. पंकजा मुंडेंमुळे आपण इथं पर्यंत पोहोचलो अशी ग्वाही दिली. यावर बोलताना माझ्या सर्व भावांना मी लाल दिवा दिलाय. मी भावांसाठी खूप लकी आहे असा खुलासाच पंकजा मुंडेंनी केला.

‘जाती-जातीचे मोर्चे निघताय हे दुर्दैव’

आज राज्यभरात जाती-जातीचे मोर्चे निघत आहे हे महाराष्ट्रचं दुदैर्व आहे. मराठा समाज आज आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. मराठा समाजातील तरुणांना शिकण्याचा,घडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही त्यांची मागणी रास्त आहे असं म्हणत पंकजांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. तसंच मराठा आंदोलनातून काही लोकं दलितांविरोधात असल्याचं भासवत आहे. आज दलित समाजाला आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. दलितांना प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न का करत नाही. प्रत्येक वेळा रस्त्यावर का यावं लागतं. त्याच्या पाठीशी उभं राहण्याची गरज आहे असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्यात.

तसंच ऊसतोड कामगारांच्या हातातून कोयता मला काढून घ्यायचा आहे. ऊसतोड कामगारांचा मुलगा जर मेडीकल आणि इंजिनियरिंगला गेला तर त्याला दर वर्षी 21 हजारांची मदत गोपिनाथ मुंडे प्रतिष्ठान तर्फे देण्यात येईल अशी घोषणाही पंकजा मुंडेंनी यावेळी केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा