सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय पंतप्रधानांनाही -मनोहर पर्रिकर

October 12, 2016 5:59 PM0 commentsViews:

manohar_parikar12 ऑक्टोबर : सर्जिकल स्ट्राईकवरुन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा भाजप सरकारला घेरले आहे. सर्जिकल स्ट्राईकसाठी मनोहर पर्रिकरांनी भारतीय लष्कराची पाठ थोपाटली आणि त्यासोबतच याचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिलंय. पर्रिकरांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय.

आज (बुधवारी) मुंबईत ‘फोरम फॉर इंटेग्रेटेड नॅशनल सिक्युरिटी संस्थेने आयोजित केलेल्या चर्चात्मक कार्यक्रमात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर सहभागी झाले होते. ‘भारताची संरक्षण सिद्धता’ या विषयावर संरक्षण विषयांचे लेखक नितीन गोखलेंनी मनोहर पर्रीकर यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत भारतीय लष्कराने नुकत्याच केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि भारत-पाकिस्तानमध्ये वाढवलेल्या तणावावर पर्रिकरांनी आपली भूमिका मांडली. पाकव्यापत काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करण्याचे श्रेय भारतीय जवानांना जाते. पण, याचं तितकंच श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही जातं. पंतप्रधानांच्या निर्णयामुळे आणि योजनेमुळे सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला. मोदी सरकारच्या काळात भारतीय सीमा आता अधिक सुरक्षित झाल्यात असा दावा पर्रिकरांनी केला.

उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकविरोधात संतापाची लाट निर्माण झाली होती. जनतेमध्ये यामुळे निराशा होती पण सर्जिकल स्ट्राईकमुळे ही निराशा दूर झाली. सर्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की सरकार सगळे निर्णय घेत असते. सर्जिकल स्ट्राईक जेव्हा घटले त्या रात्री मी झोपू शकलो नाही. खूप तणावपूर्ण ती रात्र होती असा अनुभवही पर्रिकरांनी यावेळी सांगितलं.

देशातील जनतेला काय हवंय हे आता स्पष्ट आहे. जर कुठे काही चूक झाली तर त्याला सरकारला जबाबदार ठरवले जाते. त्यामुळे कोणतेही निर्णय घेण्यासाठी आता हिंमत लागते. आता भारतात घुसखोरी करण्यासाठी पुन्हा हिंमत करणार नाही असा विश्वासही पर्रिकरांनी व्यक्त केला.

तसंच या आधी कधी सर्जिकल स्ट्राईक झालं हे मी ऐकलं नाही. जरी झाला असेल तर स्थानिक बॉर्डर कमांडरने केला असेल. आता सर्व पुरावे समोर येत आहे आधी आले नाही असा टोलाही पर्रिकरांनी यूपीए सरकारला लगावला.

पर्रिकरांच्या या वक्तव्यामुळे आपचे नेते आशुतोष यांनी नाराजी व्यक्त केलीये. भाजपचे नेते आपल्याच नेत्यांना श्रेय देण्यासाठी चढाओढ करत आहे. पंतप्रधान मोदी काय सीमेवर बंदूक घेऊन गेले होते का ? खुद्द पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राईकवर बोलण्यास मनाई केलीये. पण तरीही गोव्यात पराभव होईल या भीतीमुळे सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण करत आहे असा आरोप आशुतोष यांनी केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा