जानकरांचं भाषण असंस्कृत आणि बेजबाबदार -शरद पवार

October 12, 2016 11:23 PM1 commentViews:

pawar_on_bjp_news12 आॅक्टोबर : भगवानगडाच्या पायथ्याशी झालेली भाषणे असंस्कृतपणाची आणि बेजबाबदारपणाची होती अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यमंत्री महादेव जानकर आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना फटकारलं. तसंच अशा असंस्कृतपणाच्या पातळीवर आपल्याला उतरता येणार नसल्याने संयम आणि सहनशीलता बाळगून शांतता राखावी असं आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.

परळीचा चमचा, बारामतीचं वाटोळं करणार अशा शिवराळ भाषेत राज्यमंत्री महादेव जानकर यांनी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या वक्तव्याचे आज राज्यभरात पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जानकरांच्या पुतळ्याचं दहन केलं. शरद पवारांनीही भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेतील भाषणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. अशी भाषणं ही असंस्कृत आणि बेजबाबदारपणाची होती. त्या गडावर भाषणास परवानगी नाकारण्याचा निर्णय राज्यकर्त्यांचा होता. आणि त्याच्याशी बारामतीचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु भाषणं करणाऱ्यांनी ही बाब लक्षात घेतली नाही अशी खंत पवारांनी व्यक्त केली.

 तसंच भाषणं करणारी मंडळी मंत्रिमंडळात मंत्री आहेत. त्यामुळे ही सर्व त्यांची अंतर्गत बाब आहे. असं असतानाही एखाद्या मंत्र्याने एखाद्या भागाचे वाटोळे करीन असं म्हणणं बेजबाबदारपणाचेच नव्हे तर मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग करणारे आहे अशी टीकाही पवारांनी जानकरांचा उल्लेख न करता केली.

भगवानगडाचे महंत आणि ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यात वाद होता त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटणे शक्य आहे. आम्ही सत्तेत नसताना देखील गलिच्छ भाषेचा उपयोग केला जात आहे. फडणवीस सरकार या प्रकाराची आणि त्यांच्या सरकारमधील ‘सुसंस्कृत’ मंत्र्यांची दखल कशी घेणार ? असा थेट सवालही शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Aanand P

    dharna var kelele ajit pawar yanchya bhashya susanskrut panache hote watate…tevva tar koni chakar bolle nahi