पुण्यातील बेकायदा बिल्डिंगवर कारवाई

April 23, 2010 2:52 PM0 commentsViews:

अद्वैत मेहता, पुणे

23 एप्रिल

पुण्यातील कर्वेनगर भागात एका 11 मजली टोलेजंग बिल्डिंगचे तब्बल 5 मजले बेकायदेशीर असल्याने या अवैध बांधकामावर कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे अधिवेशनात भाजपचे पुण्यातील आमदार गिरीश बापट आणि माधुरी मिसाळ यांनी प्रश्न विचारल्यानंतर राज्य सरकारने हे कारवाईचे आदेश दिले. यामुळे महापालिका प्रशासनाची अशा अवैध बांधकामांकडे होत असलेली डोळेझाक उघड झाली आहे.

पुण्याच्या मध्यवर्ती भागात चौधरी आणि चौधरी बिल्डर्सने ही 11 मजली टोलेजंग इमारत 3 वर्षांपूर्वी बांधली होती. या भागातील भाजपचे कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी या इमारतीबद्दल माहिती मिळवली. तेव्हा तिचे 11 पैकी 5 मजले बेकायदेशीर असल्याचे उघड झाले. संदीप खर्डेकर यांनी याबद्दल विधानसभेत आवाज उठवला.

ही इमारत बेकायदेशीर असल्याचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी मान्य केले. आणि महापालिकेने यावर कारवाई केल्याचेही सांगितले.

यावर पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाचे चीफ इंजीनिअर प्रशांत वाघमारे यांनी कॅमेर्‍यासमोर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या इमारतीचे 2300 चौरस मीटर एवढे बांधकाम बेकायदेशीर आहे. त्याबद्दल संबंधित बिल्डर्सना नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत. आणि पोलीसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

या प्रकरणी बनावट टीडीआर वापरून बेकायदेशीर बांधकाम केल्याची चर्चा आहे. बिल्डर्सवर कारवाई करायला टाळाटाळ करणारे अधिकारीही यामुळे अडचणीत सापडले आहेत.

close