पॉपस्टार ‘बॉब डिलन’ला साहित्याचं नोबेल

October 13, 2016 6:28 PM0 commentsViews:

 
13 ऑक्टोबर : ‘द ऍन्सर माय फ्रेंड इज ब्लोइंग इन द विंड’ हे अजरामर गाणं लिहिणारा अमेरिकेचा पॉपस्टार बॉब डिलनला साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.अमेरिकन संगीताची परंपरा जपणारा आणि तरीही नव्या ढंगात व्यक्त होणारा हा संवेदनशील गीतकार आणि गायक आहे. साहित्याचं नोबेल मिळवणारा बॉब डिलन हा पहिलाच गीतकार आणि संगीतकार ठरलाय. बॉब डिलन 75 वर्षांचा झालाय पण त्याच्या गाण्यांमधून तो अजूनही तरुण आहे.

bob dylanबॉब डिलन हा महान कवी असल्यामुळे आम्ही त्याची या पुरस्कारासाठी निवड केली, गेली 54 वर्षं हा कलाकार सतत नाविन्याचा शोध घेतोय,असंही समितीने पुरस्कार जाहीर करताना म्हटलंय. बॉब डिलनने अमेरिकन नागरिकांच्या समस्यांना, वेदनेला आपल्या गाण्यांमधून वाट करून दिली. व्हिएतनाम युद्धानंतर अमेरिकन तरुणांना जबरदस्तीने युद्धाच्या खाईत लोटलं गेलं. बेरोजगारी, वंशभेद, अशांतता याने अमिरेकन तरुण ग्रासला होता. याच काळात बॉब डिलनने ‘ऍन्सर माय फ्रेंड इज ब्लोईंग इन द विंड’ हे गाणं लिहिलं. हे गाणं युद्धविरोधी चळवळ आणि नागरिकांच्या हक्कांच्या चळवळीचं राष्ट्रगीतच बनलं. त्याआधी गाणं हे मनोरंजनासाठी गायलं जात असे पण बॉब डिलनच्या गाण्याने मात्र समाजातल्या प्रत्येकाला आवाज मिळवून दिला.

1959 मध्ये बॉब डिलनने अमेरिकेत मिनेसोटामधल्या एका कॉफी हाऊसमध्ये गाणी गायला सुरुवात केली. सुरुवातीला तो माऊथ आर्गनसारखं अगदी साधं वाद्य वाजवायचा. त्याचे ते माऊथ ऑर्गनचे सूर आणि त्यापाठोपाठ येणारा त्याचा आवाज आजही त्याच्या चाहत्यांच्या मनात घुमतोय.

अमेरिकन लोककलेला गिटारची जोड देत बॉब डिलनने ‘गो इलेक्ट्रीक’ चा नारा दिला. हायवे – 61, ब्लाँड ऑन ब्लाँड असे त्याचे अल्बम गाजले. 1980 नंतर बॉब डिलन गाण्याचे कार्यक्रम करत जगभर फिरला. अजूनही त्याच्या गाण्याचे कार्यक्रम ऐकायला चाहत्यांची गर्दी होते. त्याच्या या प्रवासाला तो ‘नेव्हर एंडिंग टूर’ असं म्हणतो. भारतात मात्र बॉब डिलनची मैफल कधीच झाली नाही. पण त्याचे चाहते सगळीकडे आहेत. मोबाईलमध्ये एकदा सेट केलेली बॉब डिलनची कॉलर ट्यून ते कधीच बदलत नाहीत !


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा