नेत्यांचे फोन टॅप

April 23, 2010 6:08 PM0 commentsViews: 5

23 एप्रिल

आयपीएल वादाला आता नवीनच वळण लागले आहे. या प्रकरणी यूपीए सरकारने 4 बड्या नेत्यांचे फोन टॅप केले होते, अशी धक्कादायक माहिती उघड होत आहे.

आऊटलूक मॅगझिनच्या एका रिपोर्टमधून ही बाब उघड झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा फोनही टॅप केला गेला होता. आयपीएलबाबतचा वाद सुरू झाल्यानंतर म्हणजेच गेल्या 15 दिवसांतील शरद पवारांची आयपीएल कमिशनर ललित मोदी यांच्यासोबतची संभाषणे टॅप करण्यात आली आहेत.

आऊटलूकच्या रिपोर्टनुसार, या संभाषणांतून आयपीएल टीमच्या बिडींगबाबतच्या अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत. त्या पुढीलप्रमाणे…

काँग्रेस नेते दिग्विजय सिंग, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि माकपचे सरचिटणीस प्रकाश करात या नेत्यांचेही फोन टॅप करण्यात आले.

फेब्रुवारी 2007 मध्येच दिग्विजय सिंग यांची फोन संभाषणे रेकॉर्ड करण्यात आली होती. या संभाषणानुसार, ते काँग्रेसच्या वर्किंग कमिटीच्या निवडणुकीतल्या उमेदवारांसंदर्भात पंजाबमधील एका काँग्रेस नेत्याशी बोलल्याचे उघड झाले.

तर नितीश कुमार यांचा फोन ऑक्टोबर 2007 मध्ये टॅप करण्यात आला. केंद्राकडून जास्तीत जास्त फंड कसा मिळवायचा, यासंदर्भात ते सहकार्‍याशी बोलत होते. त्यांचे संभाषण दिल्लीत टॅप करण्यात आले.

प्रकाश करात यांचा फोन जून 2008 मध्ये टॅप करण्यात आला. त्यावेळी भारत-अमेरिका अणुकरारावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याच्या मुद्द्यासंदर्भात रणनीती आखली जात होती.

नेत्यांवर नजर ठेवण्यासाठी यूपीए सरकार सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा लँडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल या माध्यमांचा वापर करत असल्याची माहिती आऊटलूकने रिपोर्टमधून दिली आहे.

close