उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे तरुणीने गमावला जीव

October 14, 2016 1:39 PM0 commentsViews:

Ulhasnagar doc

14 ऑक्टोबर :  रस्त्यावरील खड्ड्यांमुळं राजकीय पक्षांमध्ये राजकारण रंगलं असताना उल्हासनगरमध्ये याच खड्ड्यांनी एका २६ वर्षीय डॉक्टर तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. नेहा मीरचंदानी असं या तरुण मुलींचं नाव आहे.

दंतवैद्यक ही पदवी घेतलेली नेहा अवघ्या २० दिवसांपूर्वी अंबरनाथ इथल्या डेन्टल कॉलेजात लेक्चरर म्हणून रुजू झाली होती. काल (गुरूवारी) सकाळी ती वडील महेश मीरचंदानी यांच्यासोबत अॅक्टिव्हा गाडीवरून कॉलेजला निघाली होती. तिचे वडील स्कूटर चालवत होते आणि ती मागच्या सीटवर बसली होती.खेमानी रोडवरून जात असताना एका रिक्षानं त्यांच्या स्कूटरला धडक दिली. या धडकेनंतर महेश यांनी सावरण्याच्या प्रयत्नात केला. मात्र, रस्त्यावरील खड्ड्यांमुळं त्यांची गाडी कलंडली आणि ते दोघेही खाली पडले. महेश हे डाव्या बाजूला पडले, तर नेहा उजव्या बाजूला पडली. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका ट्रकच्या चाकाखाली चिरडून तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, खड्ड्यांमुळं अपघात होऊन मृत्यू होण्याची उल्हासनगरमधील ही दुसरी घटना आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात एका ४५ वर्षीय इसमाचा खड्ड्यांमुळं झालेल्या अपघातात मृत्यू झाला होता. मुलीच्या मृत्यूला उल्हासनगर महापालिका जबाबदार असल्याचा कुटुंबियाचा आरोप आहे. तर उल्हासनगर पोलिसांनी अज्ञात रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा