सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड साजरा करण्यासाठी मोहाली सज्ज

October 17, 2008 6:34 AM0 commentsViews: 13

17 ऑक्टोबर, मोहाली टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड करायला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता फक्त 15 रन्स दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये त्याला या रेकॉर्डनी हुलकावणी दिली खरी पण मोहालीत होणार्‍या दुसर्‍या टेस्टमध्ये सचिन हा रेकॉर्ड पूर्ण करेल असा विश्वास क्रिकेटफॅन्सना आहे. विशेष म्हणजे सचिनसाठी मोहाली क्रिकेट ग्राऊंड बरचसं लकी ठरलं आहे.बॅटिंगमधील जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर जमा आहेत. आणि आता ब्रायन लाराचा टेस्टमधील सर्वाधिक रन्सचा रेकॉर्ड मोडायला सचिनला फक्त 15 रन्स हवे आहेत. मोहालीत सुरू होणार्‍या भारत – ऑस्ट्रेलिया दरम्यान दुसर्‍या टेस्टमध्ये हा रेकॉर्ड होणार हे आता जवळपास निश्चित झाला आहे. हा रेकॉर्ड साजरा करण्यासाठी पंजाब क्रिकेट असोसिएशनही आता सज्ज झालं आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट असून सचिनच्या रेकॉर्डमुळे या मैदानाला एक वेगळं महत्त्व प्राप्त होईल असं मोहाली क्रिकेट व्यवस्थापनानं म्हटलं आहे. भारतासाठी आणि विशेषतः सचिनसाठी पीसीएचं हे ग्राऊंड लकीचं म्हणावं लागेल. भारतीय टीम या मैदानावर 7 टेस्ट मॅच खेळली आहे. त्यातील 1994 साली झालेली वेस्टइंडीज विरुद्धची एकच मॅच भारताने गमावली आहे. तर इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या दोन्ही मॅचमध्ये भारताने विजय मिळवला आहे. 4 टेस्ट मॅच ड्रॉ झाल्या आहेत. 5 ते 6 वर्षांपूर्वी खराब फॉर्मशी झगडणार्‍या सचिननं याच मैदानावर चॅलेंजर ट्रॉफीत 3 मॅचमध्ये 300 रन्स करत दिमाखदार कमबॅक केला होता. सचिन या मैदानावर एकूण सात मॅच खेळला आहे. यात त्याने तीन हाफ सेंच्युरी आणि एक सेंच्युरी ठोकत 51 च्या अ‍ॅव्हरेजनं 459 रन्स केले आहेत. आता पुन्हा एकदा सचिनसाठी हे मैदान लकी ठरणार आहे त्याच्या वर्ल्ड रेकॉर्डसाठी!

close