जातीय मोर्चे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार?

October 16, 2016 2:31 PM0 commentsViews:

16 ऑक्टोबर: राज्यात सध्या मराठा क्रांती मोर्चांच्या निमित्ताने मोठी सामाजिक घुसळण होताना दिसतेय. कारण या मोर्चांच्या शिस्तीचं जेवढं कौतुक होतंय. तेवढंच या मोर्चांमधून अप्रत्यक्ष शक्तीप्रदर्शनामुळे ओबीसी आणि दलित समाजातली अस्वस्थता देखील वाढतेय. कारण नाशिकमध्ये जे घडलंय ते नक्कीच चिंता करायला लावणारं आहे. म्हणूनच हे जातीय मोर्चे महाराष्ट्राला नेमके कुठे घेऊन जाणार आहेत .याचाही गंभीरतेनं विचार करण्याची येऊन ठेपलीय.

मोर्चे… हे खरंतर लोकशाहीतलं आपल्या मागण्या मांडण्यासाठी केलं जाणारं एक सनदशीर आंदोलन.पण मराठा समाजाने आपल्या लोकसंख्येच्या जोरावर या मोर्चांना महामोर्चे बनवून शक्तिप्रदर्शनाचं प्रमुख हत्यार बनवलंय. प्रारंभी या मराठा क्रांती मोर्चांचं, त्यांच्या शिस्तीचं कोडकौतुकही झालं. पण मनात धडकी भरवणार्‍या या विराट मोर्चांमधली खदखद मात्र कोणीच समजून घ्यायला तयार नाहीये.

nagar_maratha
काय आहे मराठा समाजाची खदखद?

कोपर्डी अत्याचाराच्या निमित्ताने निघालेले मोर्च खरंतर आता आरक्षणाच्या मागणीवर येऊन ठेपलेत…पण आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ठ असल्याने सध्यातरी त्यावर तोडगा निघणं काहीसं कठीण वाटतंय. पण यानिमित्ताने मराठा तरुणांच्या मनातली खदखद नक्कीच बाहेर पडताना दिसतेय, हा समाज सत्ताधारी असला तरी जमिनीच्या तुकडेकरणामुळे मोठ्या आर्थिक गर्तेत सापडलाय, तरुणांना उच्चशिक्षण नाही आणि उच्चशिक्षण नाही म्हणून नोकर्‍या नाहीत.. म्हणूनच सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, नाहीतर लोक कायदा हातात घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाहीत, असे गर्भीत इशारेच या मोर्चांमधून दिले जाताहेत.

मोर्चांमध्ये छुपा जातीय उन्माद?

मराठा समाजाचे हे मोर्चे आरक्षणासाठी निघत असले तरी, यातला छुपा जातीय उन्मादही अनेकांना खटकतोय. या जातीय उन्मादामुळे ओबीसी आणि दलित समाज कमालीचा अस्वस्थ बनलाय.विशेषतः ऍट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याची मागणी तर दलित बांधवांना अजिबात मान्य नाहीये.आणि त्यातून मग प्रतिमोर्चांची मागणी जोर धरतेय. किंबहुना बीडमध्ये दलित ऐक्य मोर्चा निघाला देखील. ओबीसींनीही नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ महा मूक मोर्चा काढला.तिकडे भगवान गडावरही वंजारी समाजाने दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपलं शक्तिप्रदर्शन दाखवून दिलं.एकूणच काय तर राज्यात सध्या जातीय मोर्चे आणि मेळाव्यांचं जणू पेवच फुटलंय. आणि याची सुरूवात केलीय ती अर्थातच स्वतःला मोठा भाऊ म्हणवणार्‍या मराठा समाजाने.आणि सामाजिक सलोख्यांच्या दृष्टीने हीच सर्वाधिक चिंतेची बाब आहे.

 नाशिकमधल्या तणावाला कोण जबाबदार ?

राज्यात हे असे मराठा क्रांती मोर्चे सुरू असतानाच तिकडे त्र्यंबकेश्वरनजीकच्या तळेगावात आणखी चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली आणि एकच आगडोंब उसळला…ज्या जातीय उन्मादाची इतके दिवस भीती वाटत होती नेमकं तेच झालंय…काही समाजकंटकांनी याच घटनेचा गैरफायदा घेऊन जाळपोळ करण्याचाही प्रयत्न केला.तब्बल पाच दिवस नाशिक आणि परिसरात तणावाचं वातावरण होतं.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सलग तीन दिवस इंटरनेट बंदी जाहीर करावी लागली.यातूनच घटनेचं गांभीर्य सहज लक्षात येतंय.

सामाजिक न्यायमंत्र्यांची राजीनाम्याची भाषा

नाशिकमधील हल्ल्यांमुळे व्यथित होऊन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेंनी थेट राजीनाम्याची भाषा वापरलीय. आपला पक्ष मराठा मोर्चांना पाठिंबा देत असतानाही त्यांनी मोर्चाविरोधी सूर लावलाय.

जातीय मोर्चे महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार?

राज्यात निघणार्‍या जातीय मोर्चांच्या पार्श्वभूमीवर आपला समाज किती स्फोटक बनलाय. हे नाशिकच्या तणावावरून सहज स्पष्ट होतंय. म्हणूनच राज्यसरकारने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वेळीच कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे.नाहीतर राज्यभरातला सामाजिक सलोखा हाताबाहेर जायला फारसा वेळ लागणार नाही.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा