अनुराग कश्यपची शाब्दिक टिव टिव,पंतप्रधानांना सुनावले खडे बोल

October 16, 2016 6:57 PM0 commentsViews:

Narendra maodi andnaudad

16 ऑक्टोबर: सिनेनिर्माता आणि दिग्दर्शक अनुराग कश्यपनं ‘ऐ दिल है मुश्किल’च्या वादावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ट्विटरवर चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. पाकिस्तानला भेट देणाऱ्या पंतप्रधानांनी देशाची माफी मागावी, असं अनुरागने ट्विटरवरुन म्हटलं आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाचे चित्रिकरण सुरु असताना 25 डिसेंबरला पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिल्याची आठवण करुन देत पंतप्रधानांनी अद्याप या भेटीसंदर्भात देशाची माफी मागितली नसल्याचं कश्यपने म्हटलं.

करण जोहरचा ‘ऐ दिल है मुश्किल’ हा सिनेमा 28 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण उरी हल्ल्यानंतर अडचणीत सापडलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाचे अनुराग कश्यपने समर्थन केलं असून  त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच लक्ष्य केलं आहे.

तुम्ही वाट वळवून नवाझ शरीफना भेटायला, त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेला होतात, त्याबद्दल तुम्ही अजून माफी मागितलेली नाही. असं का? तुम्ही गप्प राहायचं आणि आम्ही विरोधाचा सामना करायचा, असं का?, असे सवाल अनुरागने नरेंद्र मोदींना टॅग करून केले आहे. त्यावरून ट्विटरवर चांगलीच शाब्दिक चकमक सुरू आहे.

आम्ही कर म्हणून दिलेल्या पैशांतून तुम्ही पाकिस्तानचा दौरा केला होतात. त्याचवेळी ‘ऐ दिल है मुश्किल’चं शूटिंग सुरू होतं. त्यासाठी कुणीतरी व्याज भरत होतं, अशी टिप्पणीही अनुरागनं केली आहे. सिनेमांना विरोध करून आणि त्यावर बंदी घालून आपले प्रश्न कसे सोडवायचे हे जगानं आपल्याकडून शिकलं पाहिजे, असा टोलाही त्यानं मोदींना लगवाला आहे.

दरम्यान, या ट्विटनंतर अशोक पंडित यांनी उरी हल्ल्यासंदर्भात बोलण्यासाठी आता वेळ मिळाला का? असं ट्विट करत मोदी पुढील 20 वर्षे देशाचे पंतप्रधान असणार आहेत, त्यामुळे या काळात तुमची मोदी विषयींची तिरस्काराची भावना नाहीशी होईल, असं म्हटलं. तर बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनंही अनुराग कश्यपच्या सुरात सूर मिसळला आहे. ‘ ऐ दिल है मुश्किलवरची बंदी हेच दाखवते की धर्मांधतेमुळे सिनेमा वाया जातो. जे लोक तथाकथित देशभक्ती दाखवून सिनेमावर बंदी घालण्याबद्दल अग्रेसर आहेत, त्यांनी या देशासाठी आणि सैनिकांसाठी काय केलंय?’ त्यामुळे अनुराग कश्यपनं सुरू केलेल्या या ट्विट्समुळे पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा तापण्याची चिन्हं आहेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा