दिवाळीच्या तोंडावर कापड कामगारांचा आजपासून बेमुदत संप

October 17, 2016 9:56 AM0 commentsViews:

Clothes market

मुंबई – 17 ऑक्टोबर:  तुम्ही दिवाळी खरेदीसाठी कापड बाजारात गेलात आणि दुकानात कापडं दाखवणाराच दिसला नाही तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण मुंबईतील गुमास्ता कामगारांनी आजपासून बेमुदत बंद पुकारला आहे.कामगारांच्या विविध मागण्यांबाबत मालकांच्या संयुक्त कृती समितीसोबत सकारात्मक चर्चा न झाल्याने मुंबई गुमास्ता युनियननं सोमवारपासून बेमुदत संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे दिवाळी अगदी तोंडावर असतांना मुंबईच्या कापड बाजारातली उलाढाल मात्र थंडावणार आहे.

सणासुदीच्या दिवसात कापड बाजारात काम करणाऱ्या कामगारांनी पगारवाढ, दिवाळी बोनस, ग्रॅज्युईटी, अशा विविध मागण्यांसाठी दोन दिवसांचा संप पुकारण्यात आला होता. मात्र त्या संपाचा कोणताच परिणाम दिसून न आल्यानं आता बेमुदत संप पुकारण्यात आला.

कामगारांच्या मागण्या मान्य करण्यास मालक तयार नसल्याने अखेर बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा संप यशस्वी झाल्यास कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई ही कापड खरेदीची सर्वात मोठ्या बाजारपेठांपैकी एक आहे. त्यातच सध्या दिवाळीच्या खरेदीनं बाजार गर्दीनं फुलून गेलाय. त्याच गर्दीला कदाचित आता काही ताटकळत उभं राहावं लागेल अशी चिन्हं आहेत. कारण कापडं दाखवणाराच नसेल तर ही जबाबदारी मालकांनाच पार पाडावी लागेल असं सध्या तरी दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा