मुंबईकरांची खड्‌ड्यांनी घेतली ‘विकेट’, पालिकेचे अधिकारी खेळताय क्रिकेट !

October 17, 2016 5:55 PM0 commentsViews:

 17 ऑक्टोबर : मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरण्याची आज शेवटची तारीख होती. पण हे खड्डे बुजवायचं सोडून पालिकेच्या कार्यालयातले कर्मचारी क्रिकेट खेळण्यात दंग असल्याचं चित्र समोर आलंय. मुंबईच्या जी नॉर्थ वॉर्डमध्ये आज शुकशुकाट आहे. या वॉर्डमधल्या रस्त्यांवरचे खड्डे तसेच आहेत पण अँटनी डिसिल्व्हा शाळेच्या मैदानावर कर्मचाऱ्यांचं क्रिकेट रंगलंय.

palika_criketमुंबईमधला हा तोच वॉर्ड आहे ज्या वॉर्डमध्ये खड्डे बुजवण्यासाठी आंदोलन झालं होतं. खड्‌ड्यांसाठी आंदोलन केल्यामुळे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना तुरुंगातही जावं लागलं. त्यामुळे मनसेने या कर्मचा•यांवर जोरदार टीका केलीय. एका चीफ इंजिनिअरला खड्‌ड्यात उभं केलं तर अपमान झाला होता मग आज हीच एकजूट खड्डे भरताना का दाखवली नाही ? असा सवालही मनसेने विचारलाय.

मुंबईचे आयुक्त अजॉय मेहता यांनी 3 दिवसांपूर्वी शहरातले सगळे खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. इतक्या कमी दिवसांत हे खड्डे बुजवायचे तरी कसे, असा प्रश्न होता. आणि त्यातच कर्मचारी क्रिकेट खेळण्यात दंग असतील तर मुंबईकरांचीच या खड्‌ड्यांमध्ये विकेट जाणार आहे. मुंबईकरांनी भरलेल्या करांतून या कर्मचाऱ्यांचे पगार होतायत पण या कर्मचाऱ्यांना मुंबईकरांच्या हिताची काही पर्वा नाही, असंच दिसतंय.

दरम्यान, ही बाब माध्यमांनी समोर आणल्यानंतर महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा