स्पेशल रिपोर्ट : निवडणुका, भाजप आणि राम मंदिर !

October 18, 2016 10:25 PM0 commentsViews:

18 ऑक्टोबर : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आणलाय. भाजपने रामजन्मभूमीपासून 15 किलोमीटर अंतरावर रामायण संग्रहालय उभारण्याची घोषणा केलीय. पण भाजपच्या निवडणूकपूर्व घोषणेची त्यांचेच खासदार विनय कटियार यांनी थट्टा उडवलीय.भाजपने म्युझियमचं लॉलीपॉप दाखवण्याऐवजी थेट मंदिरच बांधावं अशी मागणी केलीय. तर काँग्रेस आणि डाव्यांनी या प्रकाराला निवडणुकीचा मुद्दा म्हटलंय.

राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला की समजायचं उत्तरप्रदेशच्या निवडणुकाजवळ आल्यात. यंदाही काहिसं तसंच घडताना दिसतंय. भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर रामायण म्युझियम उभारण्याची घोषणा केलीय. रामजन्मभूमीपासून 15 किलोमीटर अंतरावर हे मुझियम बांधलं जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा म्युझियमच्या प्रस्तावित जागेचा दौरा देखील केलाय.ram_mandir

पण भाजपच्या घोषणेची त्यांच्याच खासदारांनी थट्टा उडवलीय. आम्हाला म्युझियम वैगरे काही नको, राम मंदिरच पाहिजे. नाहीतर हिंदुत्ववादी संघटनांना पुन्हा रस्त्यावर उतरावं लागेल, असा इशाराज कटियार यांनी दिलाय.
दरम्यान, भाजपची ही रामायण म्युझियम घोषणा म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचं काँग्रेस आणि डाव्यांनी म्हटलंय. फक्त निवडणुका आल्यावरच यांना राम मंदिर का आठवतं. असा सवालही काँग्रेसनं उपस्थित केलाय.

उत्तरप्रदेशात भाजप खरंतर 1991 पासून मंदिर वही बनायेंगेची घोषणा देत आलंय. पण कायदेशीर अडचणींमुळे राम मंदिर काही उभारलंच जात नाहीये. म्हणूनच आताची रामायण म्युझियमची घोषणा म्हणजे निव्वळ दुधाची तहाण ताकावर भागवण्याचाच प्रकार म्हणावा लागेल. अर्थात त्यावरूनही पुन्हा राजकारण सुरू झालंय आणि नेहमीप्रमाणे विकासाचा मुद्दा बाजुला पडलाय.

भाजपचं हिंदुत्व आणि राम मंदिराबद्दलचा अजेंडा प्रत्येक निवडणुकीत कसा बदलत गेला ?

लोकसभा निवडणूक 1991
- ‘मंदिर वहीं बनायेंगे’ ही मुख्य घोषणा
- निवडणूक जाहीरनाम्यात राममंदिराचा मुद्दा केंद्रस्थानी
भाजप, हिंदुत्व आणि निवडणुका

लोकसभा निवडणूक 1996
- प्रचार मोहिमेत हिंदुत्वाचा मुद्दा अजेंड्यावर
- जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्यासाठी वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार

लोकसभा निवडणूक 1998

- भाजपच्या प्रचारातून हिंदुत्वाचा मुद्दा गायब
- राममंदिर उभारणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा नाममात्र उल्लेख
 
लोकसभा निवडणूक 2004
- प्रचारात ‘शायनिंग इंडिया’ ही मुख्य घोषणा
- जाहीरनाम्यात राममंदिर बांधण्याचं पुन्हा आश्वासन

लोकसभा निवडणूक 2009
- राममंदिरासाठी चर्चा आणि कायदेशीर पर्यायांचा विचार करण्याची तयारी

लोकसभा निवडणूक 2014
- निवडणुकीत विकास आणि रोजगारावर संपूर्ण भर
- जाहीरनाम्यात राममंदिरासाठी कायदेशीर शक्यता तपासण्याचंं आश्वासन


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close