राजनाथ सिंहांच्या आश्वासनानंतर ‘मुश्किल’ पेच सुटणार !

October 20, 2016 1:35 PM0 commentsViews:

karan_johar_rajnath20 ऑक्टोबर : ‘ए दिल है मुश्किल’चा वाद आता थेट केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कोर्टात पोहोचलाय. दिग्दर्शक करण जोहर आणि प्रोड्युसर्स गिल्डचे अध्यक्ष मुकेश भट यांनी दिल्लीत राजनाथ सिंह यांची भेट घेतली. तुमची दिवाळी चांगली जाईल चिंता करू नका असं आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिलं.

आधी पाकिस्तानी कलाकार आणि त्यानंतर ‘ए दिल है मुश्लिक’ला मनसेनं विरोध केल्यामुळे प्रदर्शित होण्यात अडथळा निर्माण झाला. अखेर या वादावर करण जोहर आणि मुकेश भट यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे धाव घेतली. राजनाथ सिंह यांच्यासोबत बैठकीनंतर मुकेश भट यांनी मीडियाशी संवाद साधला. आमची चर्चा सकारात्मक झाली असून गृहमंत्र्यांनी चिंता करण्याची गरज नाही असं सांगून संपूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही दिलीये. आता आम्ही समाधानी आहोत असं भट म्हणाले.

आम्ही पाकिस्तानी कलाकार फवाद खानला सिनेमात घेतलं तेव्हा दोन्ही देशामध्ये तणावपूर्ण परिस्थिती नव्हती. आम्ही फक्त मनोरंजनाच्या दृष्टीकोनातून कलाकारांना सिनेमात घेतलं होतं. आता लोकांनी ठरवायला हवं की त्यांना सिनेमा पाहायचा की नाही पाहायचा हा त्यांचा निर्णय आहे. काही लोकं उगाच वातावरण दुषित करत आहे असा टोलाही भट यांनी मनसेला लगावला.

याआधीही करण जोहर आणि टीमने मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. त्यांनीही संपूर्ण संरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. एवढंच नाहीतर मंगळवारी रात्री 12 मनसे कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close