पालिका निवडणुकीत सेनेचं ‘एकला चलो रे’ ?

October 20, 2016 5:13 PM0 commentsViews:

uddhav_on_cmमुंबई, 20 ऑक्टोबर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेनं ‘एकला चलो रे’चा नारा दिलाय. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

शिवसेनेनं मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अखेरीस, स्थानिक स्वराज्यसंस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यावर शिवसेना लोकप्रतिनिधींनी मानसिकता दाखवलीय. खरंतर पक्षाच्या वतीनं अधिकृत घोषणा अजून झाली नसली तरी, भाजपच्या मागे फरपटत न जाता आपली ताकद दाखवण्याची गरज या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

राज्यात वर्षानुवर्षे मोठ्या भावाची भूमिका बजावल्यानंतर आता सत्तेत दुय्यम स्थान मिळाल्याची सल शिवसेनेला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपनं एकतर्फी उमेदवार घोषित केल्यानं सेना दुखावली गेलीय. या दोन मित्रांमधली धुसफूस कधीच लपून राहिलेली नाहीय. म्हणूनच भाजपसोबत सन्मानजनक युती होत नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा सूर शिवसेनेत उमटतोय. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला सेना आमदार,खासदार आणि मंत्री उपस्थितीत होते. या बैठकीत सेनेच्या लोकप्रतिनिधींनी हीच भावना पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवली..

भाजपनं मात्र सावध भूमिका घेतलीय. त्यामुळे सेनेच्या इराद्यावर थेट प्रतिक्रिया देण्यापेक्षा 25 वर्षांपासूनच्या युतीचा दाखला भाजपनं दिलाय.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सेना-भाजपची 25 वर्षांची युती तुटली. पण त्यानंतर सत्तेसाठी त्यांना एकत्र यावं लागलं. पण ग्रामीण भागात सेनेची ताकद भाजपपेक्षा जास्त असल्यानं स्बबळाची परीक्षा घ्यायला हरकत नसल्याची सेना नेत्यांची भावना आहे. आता उद्धव ठाकरे कोणती अधिकृत घोषणा कधी करतायेत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
- नवीन पटनायक यांना भाजपनं संपवण्याचा प्रयत्न केला होता
- पण पटनायक यांनी भाजपला अंगावर घेतलं त्यामुळे त्यांचा पक्ष टिकला
- तामिळनाडूत जयललिता आजारी असतानाही त्यांचा पक्ष एकजूट आहे
- बिहारमध्ये लालूंनी भाजपला कडवी झुंज दिली
- आपण कुठे कमी आहोत, एकट्यानं लढायची तयारी करा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close