कोपर्डी प्रकरणी आरोपी नितीन भैलुमे दोषमुक्त नाही

October 20, 2016 5:57 PM0 commentsViews:

kopardi4320 ऑक्टोबर : कोपर्डी बलात्कार प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टाने फेटाळलाय. नितीन भैलुमे हा या प्रकरणातला तिसरा आरोपी आहे. नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलैला एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आल्याची दुदैर्वी घटना घडली होती. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. आता या प्रकरणी अहमदनगरच्या सत्र न्यायलयात खटला सुरू आहे.

कोपर्डी घटनेमध्ये 3 आरोपींवर खटला चालवण्यात येतोय. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे तिघांवर बलात्काराचा आरोप आहे. जितेंद्र शिंदे आणि नितीन भैलुमे हे एकमेकांचे मावसभाऊ आहेत आणि संतोष भवाळ हा या दोघांचा मित्र आहे. नितीन भैलुमच्या वकिलांनी नितीनला दोषमुक्त करावं, असा आग्रह आज कोर्टात धरला. नितीन आपल्या परिवारासह पुण्यात राहतो. तो त्यादिवशी त्याच्या काही कामांसाठी कोपर्डीला आला होता. त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही, असा वकिलांचा दावा होता.

सरकारी पक्षाच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी हा दावा खोडून काढला. हे तिन्ही आरोपी मित्र आहेत आणि या घटेनच्या 2 दिवस आधी त्यांना काही लोकांनी बलात्काराच्या घटनेच्या परिसरात फिरताना पाहिलं होतं. या तिघांनी या मुलीची छेड काढल्याचंही साक्षीपुराव्यात पुढे आलंय. त्यामुळे नितीन भैलुमेचा अर्ज कोर्टाने फेटाळला. याविरोधात कोर्टात जाण्यासाठी नितीन भैलुमेला 27 तारखेपर्यंत मुदत देण्यात आलीय. त्यामुळे या खटल्याची पुढची सुनावणी 7 नोव्हेंबरला होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close