शेवटही ‘तिखटच’, डॉनल्ड ट्रम्प हार मान्य करणार नाही ?

October 20, 2016 3:08 PM0 commentsViews:

Candidates Hillary Clinton And Donald Trump Hold Third Presidential Debate At The University Of Nevada20 ऑक्टोबर : अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वातावरण आता चांगलंच तापलंय. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डॉनल्ड ट्रम्प यांच्यात आज तिसरं आणि शेवटचं डिबेट झालं. लास व्हेगासमध्ये झालेल्या या वादविवादाच्या फेरीत प्रचाराचा विखारी सूर पुन्हा दिसून आला.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फिक्सिंग झालंय, असा आरोप डॉनल्ड ट्रम्प यांनी केलाय. त्यावर या डिबेटमध्ये ट्रम्प यांना प्रश्न विचारण्यात आला. या निवडणुकीत हिलरी क्लिंटन जिंकल्या तर ट्रम्प आपला पराभव मान्य करतील का, असं या डिबेटच्या मॉडरेटरने त्यांना विचारलं. त्यावर, मी त्यावेळी निर्णय घेईन, असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं. म्हणजेच ट्रम्प आपल्या आरोपावर ठाम आहेत आणि ते आपला पराभव स्वीकारणार नाहीत, असंच दिसतंय.

8 नोव्हेंबरला अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी मतदान होतंय. मतदानासाठी 3 आठवड्यांचा अवधी राहिलेला असताना वेगवेगळ्या जनमत चाचण्याही घेतल्या जातायत. या सगळ्या चाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आघाडीवर आहेत. डॉनल्ड ट्रम्प यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्यांचा व्हिडिओ रिलीज झाला आणि त्यामुळे जनमत ट्रम्प यांच्या विरुद्ध गेलंय. तरीही ट्रम्प यांनी त्यांचा बेताल वक्तव्य सुरूच ठेवलीयत. हिलरी क्लिंटन या खोडसाळ महिला आहेत, असंही ट्रम्प या डिबेटमध्ये बरळले.

अमेरिकेच्या निवडणुकीत डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव होणार हे तर स्पष्टपणे दिसतंय. पण ट्रम्प यांनी त्यासाठीही उफराटी रणनीती आखलीय. या निवडणुकांचा निकाल जर ट्रम्प यांनी मान्य केला नाही तर अमेरिकेसारख्या लोकशाही राष्ट्राची राजकीय परंपरा मोडीत निघेल, असं म्हणत हिलरींनी ट्रम्प यांच्यावर हल्ला चढवला.

राष्ट्राध्यक्षपदाच्या या 2 उमेदवारांमध्ये तिन्ही वादफे•ऱ्या पूर्ण झाल्यायत आणि आता मतदानाचा टप्पा जवळ येऊन ठेपलाय.अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून हिलरी क्लिंटन यांची नेमणूक झाली तर ही निवडणूक ऐतिहासिक ठरणार आहेच. पण त्याहीपेक्षा ट्रम्प यांच्यासारख्या उमेदवारांमुळे अमेरिकेची ही सर्वात वादळी निवडणूक ठरलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close