‘भारतात पाकिस्तानी कलाकारांवर सरसकट बंदी नाही’

October 20, 2016 8:13 PM0 commentsViews:

favad_khan20 ऑक्टोबर : उरीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना तीव्र विरोध होतोय. फवाद खानच्या ‘ए दिल है मुश्किल’ या सिनेमावरूनही बराच वादंग माजलाय. आता परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिलंय. पाकिस्तानी कलाकारांवर भारतात सरसकट बंदी घातलेली नाही,असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलंय.

पाकिस्तानात भारतीय चित्रपटांवर बंदी घालण्यात आलीय. भारतीय टीव्ही चॅनल आणि रेडिओवरही पाकमध्ये बंदी आहे. याबद्दल पत्रकारांनी विकास स्वरूप यांना विचारलं. यावर, पाकिस्तानचा हा निर्णय दुदैर्वी आहे आणि यातून पाकिस्तानच्या आत्मविश्‍वासाचा अभाव दिसतो, अशी टिप्पणी विकास स्वरूप यांनी केली.

दरम्यान, करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा 28 नोव्हेंबरला रिलीज होतोय. या सिनेमात फवाद खान हा पाकिस्तानी कलाकार असल्यामुळे सिनेमाच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत. आज नागपूरच्या बर्डी परिसरात ‘इटनिर्टी’ या मल्टीप्लेक्समध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. ‘ए दिल है मुश्किल’ हा सिनेमा रिलीज होऊ देणार नाही, असा इशारा मनसेनं दिलाय.

भारतीय कलाकारांनी पाकिस्तानी कलाकारांबद्दल वेगवेगळया भूमिका घेतल्यायत. फक्त कलाकारांनाच लक्ष्य करणं चुकीचं आहे,असं अभिनेत्री प्रियांका चोप्राने म्हटलंय. अभिनेता सलमान खानने पाकिस्तानी कलाकारांची बाजू घेत त्यांच्यावर बंदी आणू नये, असं मत व्यक्त केलंय. पण आता परराष्ट्र मंत्रालयाच्या वक्तव्यामुळे भारतात पाकिस्तानी कलाकारांवर सरसकट बंदी नाही हे स्पष्ट झालंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close