कोण आहेत संजय काकडे ?, एका बिल्डरचा कसा झाला राजकारणी

October 21, 2016 10:57 PM0 commentsViews:

21 ऑक्टोबर : पुणे भाजपात गुंडांना प्रवेश देण्यावरून बिल्डर कम राजकारणी संजय काकडे सध्या चांगलेच चर्चेत आलेत. पुणे भाजपात सुरू असलेली त्यांची राजकीय लुडबूड निष्ठावंतांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरतंय. पण नागपूरकरांच्या राजकीय वरदहस्ताने सुसाट सुटलेले काकडे काही केल्या थांबायला तयार नाहीत. आपण भाजपात आणलेले लोक हे गुन्हेगार नसल्याचेच ते सांगत सुटलेत..

खासदार संजय काकडे,….मूर्ती दिसायला तसी लहान पण सध्याची त्यांची किर्ती पाहिली तर महान अशीच म्हणावी लागेल..होय, कारण त्यांनी पुण्यातल्या गुंडांना भाजपात आणून वाल्यांचे वाल्मिकी करण्याचा जणू चंगच बांधलाय. तेही मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने….खासदार संजय काकडेंच्या या पुण्यकर्मावर मीडियाने आवाज उठवताच ते भलतेच नाराज झालेत म्हणे….पिंट्या धाडवे, श्याम शिंदे आणि पप्पू घोलप या तिघांनाही कोर्टाने निर्दोष सोडलं असेल ते गुन्हेगार कसे, असा उलट सवाल काकडेंनी केलाय.

संजय काकडेंच्या या गुन्हेगारी राजकीय प्रवेशाच्या समर्थनामुळे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापटांची मात्र, चांगलीच गोची झालीये. म्हणूनच त्यांनी इथून पुढचे राजकीय प्रवेश हे मला विचारल्याशिवाय नको….असं फर्मान काढलंय म्हणे.sanjay_kakde

पण, बापटांनी सांगूनही ऐकले तर ते संजय काकडे कसले.. कारण त्यांना थेट नागपूरकरांचा वरदहस्त मिळालाय म्हणे…कदाचित म्हणूनच…कधीकाळी अजित दादांच्या मागेपुढे फिरणारे संजय काकडे आता थेट अजित पवारांनाच अंगावर घ्यायला निघालेत..

संजय काकडेंची मजल थेट अजितदादांच्या मांडीपर्यंत गेलीय ते….सत्ताधा•यांच्या मांडीवर बसल्याचा हा परिणाम असावा कदाचित…असो…पण कधीकाळी हेच संजय काकडे पुण्यात भाजी विकायचे म्हणे…तसे ते मुळचे बारामतीचे असल्याचं सांगितलं जातं. पुढे याच बारामती कनेक्शनचा फायदा उचलत त्यांनी पवारांच्या वरदहस्ताने थेट बांधकाम व्यवसायात उडी घेतली…आणि कमालीचे यशस्वी देखील झाले…आज पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात संजय काकडे ग्रुपचं मोठं साम्राज्य आहे.pune_gunda_bjp

पण इथवर थांबतील ते काकडे कसले….म्हणून मग त्यांनी अजित पवारांच्या मागे लागून आधी आमदारकी आणि नंतर खासदारकीसाठी प्रयत्न करून पाहिले..राष्ट्रवादीकडून डाळ शिजत नाही म्हटल्यावर मग त्यांनी थेट अपक्ष म्हणूनच रिंगणात उडी घेतली…आणि चमत्कार बघा….ते बिनविरोध निवडून देखील आले. अर्थात त्यावेळी त्यांनी एकाचवेळी सर्व पक्षांना मॅनेज करण्याचं शिवधनुष्य नेमकं कशाच्या जोरावर पेललं हे सुज्ञास सांगणे न लगे…..असो…पण सत्ताबदल बदल होताच याच संजय काकडेंनी पवारांच्या मांडीवरून नागपूरकरांच्या मांडीवर नेमकी कधी उडी मारली. हे राष्ट्रवादीला देखील कळलं नाही.

आता तर याच संजय काकडेंनी पुणे महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणून देण्याचा विडाच उचललाय म्हणे…

विरोधक, कोण हे संजय काकडे असं विचारत असले तरी भाजपात मात्र, त्यांचं चांगलंच वजन वाढलंय म्हणे… एका साध्या बिल्डरचा हा राजकीय उत्कर्ष बघून इतरांचेही डोळे विस्फारले नाही तर नवलंच…म्हणूनच पुढे जाऊन अविनाश भोसलेंनी राजकारणात उडी घेतली नाही म्हणजे मिळवली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close