यंदा बळीराजाच्या घरीही नवे कपडे आणि फटाके !

October 22, 2016 9:30 PM0 commentsViews:

सिध्दार्थ गोदाम,औरंगाबाद, 22 ऑक्टोबर : राज्यात गेल्या चार वर्षांपासून पावसाच्या कमतरतेमुळे दुष्काळ निर्माण झाला होता. हजारोंच्या संख्येनं राज्यात शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. सर्वाधिक शेतकऱ्यांनी दुष्काळामुळं गळाला फास लावला होता. मात्र यंदा पावसानं साथ दिली आणि शेतकऱ्यांच्या शिवारात खळी सुरू झालीत.चांगलं पीक आल्यानं शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर चांगला पैसा हाती पडणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी ग्रामीण भागात जोरदार उत्साह आहे.baliraja_diwali

औरंगाबाद तालुक्यातील चित्ते गावचं हे शेतकरी जोडपं आपल्या शेतात समाधानानं फिरतंय. कारण 4 वर्षांनंतर पहिल्यादाच त्याच्या मालकीचं शिवार हिरवं झालंय. नुसतं हिरवच नाही तर त्यांच्या शेतात सोयाबीन आणि मक्क्याचं पीक भरभरून आलं. भास्कर गावंडे आपली पत्नी लताबाई हिला कौतूकानं भरलेलं मक्याचं कणिस दाखवताय. कारण, चांगला आलेल्या पिकामुळे त्यांना चांगली दिवाळी साजरी करता येणार आहे.

पिंपळगावचं शेतकरी कुटुंब गोपीनाथ आणि अनिता गावंडे. मोठ्या उत्साहात बाजरीची मळणी करतायत…यंदा त्यांना बाजरीचं अपेक्षेपेक्षा जास्त पीक आलं आहे. गेल्या 4 वर्षांपासून गावंडे दांपत्याचा खर्च फक्त पेरणीवर होत होता. हाती काही लागत नव्हतं..आता एकर भरात 12 पोती बाजरी झाल्यानं चांगल्या दिवाळीची तयारी करतायत. मुलांना नविन कपडे..फटाके आणि चांगली मिठाई ते मुलांना देणार आहेत.

परतीच्या पावसानं साथ दिल्यानं मराठवाड्यात खरीपाचं चागंल पीक आलंय. त्यामुळे सोयाबीन,मक्का,बाजरीचं विक्रमी उत्पादन होणार आहे.येणाऱ्या तुरीच्या पीकाचीही चांगली वाढ आहे. शिवारात पाण्याचे साठेही चांगले आहेत. त्यामुळे मराठवाड्यात शेतक-यांना चार वर्षांनंतर मनासारखी दिवाळी साजरी करता येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close