वेलिंगकरांसोबत युती, दिवाळीनंतर करणार घोषणा – उद्धव ठाकरे

October 23, 2016 1:42 PM0 commentsViews:

uddhav on MeatBan

23 ऑक्टोबर :  गोव्यात सत्ताधा-यांकडून जनतेच्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण होताना दिसत नसल्याचे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत सुभाष वेलिंगकरांसोबत युती होणार हे ठरले आहे. पण दिवाळीनंतरच याबाबतची सविस्तर माहिती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. वेलिंगकरांसोबत विचार जूळत असल्याने युतीचा विचार केला. पण भाजपविरोध हा आमचा अजेंडा नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांसाठी गोवा दौ-यावर आले आहेत. रविवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत याबाबतची अधिकृत घोषणा करत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. लष्कराचा एक स्वाभिमान आहे, पण खंडणीसारखे पैसे वसूल करून लष्कर कल्याण निधीला पैसे देण दुर्दैवी आहे, असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर यांची बैठक घेऊन वादावर तोडगा काढला.  या पार्श्वभूमीवर बोलताना “काल जी बैठक झाली त्यात एक नवा चित्रपट बनवण्याचे ठरले.या चित्रपटाचे नाव ‘ये तो होना ही था’, असं असेल असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

गोव्यात भाजपकडून अपेक्षित काम होत नाही, विकास कामेही झाली नाही अशी टीका त्यांनी केली. राजकीय कारणामुळे शिवसेना गोव्यात आली नव्हती, पण  यापुढे शिवसेना मागे हटणार नाही. चांगली माणस सोबत घेऊन गोव्यात राजकारण करणार असून आम्ही फक्त निवडणुकीसाठी गोव्यात आलेलो नाही. आमचे शिवसैनिक २४ तास काम करतील असंही ते म्हणालेत. महाराष्ट्राबाहेर शिवसेना आणि भाजप कधीच एकत्र लढलेले नाहीत. त्यामुळे आमची युती तुटण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही असं त्यांनी नमूद केलं. सुभाष वेलिंगकर यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. युतीबाबत तत्वत: एकमत झालं आहे. आता जागावाटपावरुन आमची चर्चा सुरु आहे. दिवाळीनंतर मी पुन्हा गोव्यात येणार असून त्यावेळी युतीबाबत सविस्तर माहिती देऊ असं त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close