बीएमसीनं मागवला आणखी एक पेंग्विन !

October 24, 2016 5:32 PM0 commentsViews:

american penguine24 ऑक्टोबर : मुंबईत भायखळ्याच्या जिजामाता उद्यानात एका पेंग्विनचा मृत्यू ओढवलाय. आता उरलेल्या 7 पेंग्विनची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. पण महापालिका दक्षिण कोरियाहून आणखी एक पेंग्विन आणणार आहे. दक्षिण कोरियाच्या मत्स्यालयातून 3 महिन्यांपूर्वीच 8 पेंग्विन आणण्यात आले होते. सेऊलमधल्या कोअेक्स मत्स्यालयातून 26 जुलैला या पेंग्विन पक्ष्यांना मुंबईच्या जिजामाता उद्यानात आणलं होतं.

या पेेंग्विनसाठी 16 ते 18 डिग्री तापमान नियंत्रित करण्यात आलं होतं, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. पण आठ पेंग्विनपैकी एक मादी पेंग्विन काही दिवसांपासून निस्तेज झाली होती. ती काही खातही नव्हती. तिला श्‍वसनाचाही त्रास होत होता. या पेंग्विनच्या बऱ्याच चाचण्या घेण्यात आल्या. व्हेटर्नरी डॉक्टर्सनी तिच्यावर उपचारही केले पण अखेर तिचा मृत्यू ओढवला.

19 ऑक्टोबरला या पेंग्विनच्या रक्ताच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये पेंग्विनच्या यकृतावर परिणाम झाल्याचं लक्षात आलं. पण एक्स रे आणि अल्ट्रासोनोग्राफी चाचण्यांमध्ये मात्र काहीच दिसून आलं नाही. पेंग्विनची ही मादी उपचारांना प्रतिसाद देत नव्हती आणि अखेर 23 ऑक्टोबरला सकाळी सव्वाआठच्या सुमाराला या पेंग्विनचा मृत्यू ओढवला.

या पेंग्विनला ग्रॅम निगेटिव्ह या जीवाणूचा संसर्ग झाला आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मुळात मुंबईच्या वातावरणात पेंग्विन तगू शकणार नाहीत, असे इशारे सागरी जीवशास्त्रज्ञांनी आधीच दिले होते. तरीही युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हट्टामुळे हे पेंग्विन जिजामाता उद्यानात आणण्यात आले. त्यांच्यासाठी प्राणीसंग्रहालयाच्या नव्या इमारतीत तळमजल्यावर 1700 चौ. फुटांचा वातानुकूलित कक्ष तयार करण्यात आला. या कक्षामध्ये पेंग्विन काहिसे रुळल्यावर मग त्यांना प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार होतं. पण त्याआधीच पेंग्विनचा मृत्यू ओढवलाय.

या 8 पेंग्विनच्या खरेदीसाठी महापालिकेने सुमारे 3 कोटी रुपये मोजले. पेंग्विनसाठीचं शीतघर आणि त्यांची देखभाल यासाठी एकूण 45 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय.पण आता या पेंग्विनचा मृत्यू ओढवल्यामुळे बाकीचे पेंग्विन तरी तग धरतील का ? असा प्रश्न विचारला जातोय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close