पहिले हौतात्म्य उपेक्षितच

April 28, 2010 12:27 PM0 commentsViews: 9

प्रताप नाईक, बेळगाव

28 एप्रिल

महाराष्ट्र या वर्षी उत्साहात सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. पण दुसरीकडे मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी पहिला हुतात्मा देणारा बेळगाव आजही महाराष्ट्रात येण्यासाठी तिष्ठत आहे.

हुतात्म्याच्या नातेवाईकांना अजूनही पेन्शनदेखील मिळत नाही.

बेळगाव जिल्ह्यातील कंग्राळी खुर्द हे गाव सध्या कन्नड सक्तीच्या बेडीत अडकले आहे. तरीही गावातील मुख्य चौकात महाराष्ट्र राज्याचा बोर्ड अनेक वर्षांपासून दिमाखात उभा आहे. याच गावच्या 22 वर्षाच्या मारुती बेन्नाळकर या पैलवानाने 17 जानेवारी 1956 साली संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले पहिले बलिदान दिले. पण या बलिदानाचे अजूनही चिज झाले नसल्याची खंत त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई बेन्नाळकर व्यक्त करतात. कारण राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे सीमाभाग अजूनही महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात आलेला नाही.

संपूर्ण महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पण ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले बलिदान दिले, असे बेळगावमधील 8 हुतातत्म्यांपैकी बाळू निलजकर यांच्यासह मधू बांदेकर, कमलाबाई मोहिते, लक्ष्मण गावडे, गोपाळ चौगुले या 5 हुतात्म्याच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने अजूनही पेन्शन सुरू केलेली नाही.

एकीकडे महाराष्ट्रात येण्याची जीवापाड धडपड तर दुसरीकडे हुतात्म्याच्या वारसांना पेन्शन मिळत नसल्याची खंत सीमावासीयांच्या मनात सलत आहे. किमान महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असताना महाराष्ट्रातल्या सरकारला आणि राजकीय नेत्यांना सीमावासियांच्या व्यथा कळाव्यात आणि सीमाभाग महाराष्ट्रात यावा हीच त्यांची अपेक्षा आहे.

close