पेंग्विन मृत्यूचा शोक प्रस्ताव, कधी संपणार हे कवित्व ?

October 27, 2016 11:42 AM0 commentsViews:

 प्रणाली कापसेसह, मुंबई

26 ऑक्टोबर :  मुंबईच्या राणी बागेतल्या पेंग्वीनच्या मृत्यूचं उत्तरकवित्व काही केल्या संपायला तयार नाहीये. आदित्य ठाकरेंच्या बालहट्टापासून सुरू झालेलं पेंग्वीनच्या मृत्यूचं पुराण आता थेट शोकप्रस्तावापर्यंत येऊन ठेपलंय. एवढंच नाहीतर पेंग्विंनला पनवती लागल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटल्यानंतर विरोधकांनी हा विषय थेट पनवती फंडापर्यंत नेऊन ठेवला आहे.

पेग्विंन… हा खरंतर अंटार्टिका खंडात म्हणजेच अतिशय थंड प्रदेशात राहणारा दुर्मिळ पक्षी. पण आले युवराजांच्या मना, तिथे कोणाचे चालेना. या उक्तीप्रमाणे याच बिचाऱ्या पेग्विंनची थेट राणीबागेत पाठवणी झाली… ते ही तब्बल 3 कोटी रुपये खर्चून, असो… ठाकरे युवराजांचा बालहट्ट दुसरं काय… तर मंडळी थेट दक्षिण कोरियामधून आयात केलेल्या याच 8 पेग्विंनपैकी एका मृत्यूचा काय झाला आणि विरोधकांनी एकच गजहब माजवला… पेग्विंनची मृत्यूप्रकरणावर थेट स्थायी समितीत खडाजंगी झाली. पेग्विंनच्या परत पाठवणीचे पोस्टर्सही मुंबईभर झळकवले गेले. पण एवढ्यावरच थांबतील तर ते राजकारणी कसले. पेंग्विंनच्या मृत्यूची कारणमिमांसाही लागलीच विरोधकांनी उरकून टाकली. कोणी म्हणालं पेंग्विंनला मुंबईचं दमट हवामान सूट झालं नाहीतर कुणी म्हणालं त्यांना ट्रेस सहन झाला नाही. उद्धव ठाकरेंनी तर पेंग्विन्सना विरोधकांचीच पनवती लागल्याचा गंभीर आरोप केला. तर काँग्रेसच्या नगरसेविका वकारून्निसा यांनी तर थेट शोक प्रस्तावाचीच मागणी केली.

पेंग्विंनच्या मृत्यूला पनवती लागल्याचा आरोप झाल्यानंतर विरोधक गप्प बसतील तर ते विरोधक कसले. पेंग्विंन्सला आमची पनवतीच लागली असेल तर मग पालिकेनंही यापुढे पनवती फंडच सुरू करावा, अशी मागणी मनसे नगरसेवक संतोष धुरी यांनी केलीय.

तर मंडळी पेग्विंनच्या मृत्यूला एकूणच आदित्य ठाकरेंचा बालहट्टच जबाबदार असल्याचा सूर विरोधकांनी लावलाय. पण मंडळी ठाकरे फ्रमिलीचं हे पक्षी-प्राणीप्रेम काही आजचं नाहीये. असं म्हणतात की, उद्धव ठाकरेंनी परदेश दौऱ्यावरून येताना चक्क सव्वालाखांचे 3 मासे आणले होते म्हणे…पण इथलं हवामान सूट न झाल्याने ते मरण पावल्यानं दुःखी झालेल्या उद्धव ठाकरेंनी 3 दिवस अन्नपाणी सोडलं होतं म्हणे. त्यामुळे आताच्या या पेग्विंन मृत्यू प्रकरणानंतर उद्या पुढे जाऊन आदित्यठाकरे दुःखी कष्टी झाल्याच्या बातम्या आल्यास आश्चर्य वाटून देऊ नका. फक्त आदित्यच नाहीतर आदित्यचा धाकटा तेजस यालाही खेकडे, साप, सरडे, विंचू हे प्राणी अभ्यासण्याचा नाद आहे म्हणे…मध्यतंरी तर कुठल्यातरी खेकड्याला थेट ठाकरेंचं नाव पण दिल्याच्या बातम्या आल्या होत्या…असो…हे झालं उद्धव ठाकरे फॅमिलीचं. राज ठाकरेंनाही कुत्री पाळण्याचा मोठा शौक आहे. त्यांच्या घरात तब्बल 8 जातीची कुत्री आहेत. त्यातलाच एक कुत्रा शर्मिला ठाकरेंना चावला होता…पण तरीही ठाकरेंनी त्या कुत्र्याला घराबाहेर काढलं नाही. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनाही कुत्री पाळण्याचा छंद होता म्हणे. तर मंडळी, ठाकरे फॅमिलीचं प्राणीप्रेम सिद्ध व्हायला एवढी उदाहरणं पुरेशी आहेत. कदाचित म्हणूनच उद्या पुढे जाऊन राणी बागेतले सर्व पेग्विंन मेले तरी चालतील पण युवराज काही त्यांची परत पाठवणी करणार नाहीत… आणि तोपर्यंत हे पेग्विंग मृत्यूपुराणाचं हे कवित्व  असंच सुरू राहणार, असंच दिसतंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close